Saturday, May 4, 2024
Homeनगरशिक्षक बँकेसाठी आता सोमवारीच होणार माघार

शिक्षक बँकेसाठी आता सोमवारीच होणार माघार

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. शुक्रवारी (काल) देखील ७९९ उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यापैकी एकाने देखील माघार घेतलेली नाही.

- Advertisement -

सोमवार (दि.११) हा माघारीचा अखेरचा दिवस असून दुपारी ३ नंतर माघारीची मुदत संपणार आहे. यामुळे सर्व मंडळांसाठी रविवार (दि. १०) महत्वाचा ठरणार असून याच दिवशी युती आणि आघाडीच्या बोलण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, छोटी मंडळे आणि संघटनांना प्रमुख मंडळांनी सोबत न घेतल्यास या सर्वांची चौथी आघाडी होण्याची दाट शक्यता गुरूजींच्या गोटातून देण्यात आली.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीत आतापासून वर्चस्ववादातून अंतर्गत कुरबुरी अन् कुरघोड्यांना वेग आला आहे. दुसरीकडे कोणाला सोबत घ्यायचे, आणि कोणासोबत जायचे, यावरूनही काही मंडळात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे. शिक्षक बँकेची निवडणूक २४ जुलै रोजी होणार आहे. तर, अर्ज माघारीची शेवटची मुदत ही सोमवारी आहे.

निवडणुकीत आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल, तर इतरांना बरोबर घ्यायचे नाही, असा जवळपास सर्व प्रमुख मंडळाचा सूर आहे. दुसऱ्यांसोबत घेतले तर आपले नाराज होती असे प्रमुख मंडळाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे अद्याप छोट्या मंडळांना प्रमुख मंडळ भाव देत नसल्याचे चित्र आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी नेते गप्प असले तरी प्रमुख मंडळ असणार गुरूकुल, गुरूमाऊली तांबे गट आणि गुरूमाऊली रोहकले गटाचे दुसऱ्या, तिसऱ्या फळतील कार्यकर्ते ऐक्य, सदिच्छा, इब्टा, शिक्षक संघ, शिक्षक भारती या मंडळाच्या नेत्यांना चाफसून पाहत आहेत.

मंगळवारपासून खऱ्याअर्थाने शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी रंगणार आहे. माघारीनंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर गुरुजी मतदान होईपर्यंत कामाला लागणार असून हा फुटला, याला सोबत घेतल्याच्या अफवांना उत येणार आहे. तालुक्यातालुक्यांत बँकेच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघटना भिडणार असून यात शिक्षण क्षेत्राचे नाव खराब होऊ नये, अशी अपेक्षा सामान्य शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

शिक्षक बँकेच्या राजकारणाचा भल्याभल्यांना अंदाज नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सत्तेत आलेल्या गुरूमाऊली मंडळाने शेवटपर्यंत अन्य मंडळांना चर्चेत गुंतून ठेवले आणि युती आघाडी होवून दिली नाही. यामुळे विरोधकांना संधी न मिळाल्याने ते स्वतंत्रपणे लढले आणि यात मोठ्या फरकाने गुरूमाऊली मंडळ विजयी झाले.

यंदा परिस्थिती वेगळ आहे. जवळपास ११ मंडळ आणि संघटनांनी आपले इच्छुक निवडणुकीत उतरवले आहे. आतापर्यंत कोणाची कोणासोबत युती झालेल्या जाहीर झालेले नाही. प्रमुख मंडळांनी छोट्या मंडळांना सोबत न घेतल्यास या । सर्व छोट्या मंडळाची मोट बांधून बँकेच्या निवडणुकीत चौथे मंडळ अस्तित्वात येणार आहे आणि हे अस्तित्वात आलेले मंडळ बँकेच्या निवडणुकीत चमत्कार देखील घडवू शकते, असा दावा या मंडळांकडून करण्यात येत आहे.

बिनविरोध बैठकीनंतर नेत्यांची बाचाबाची

मागील शनिवारी शिक्षक बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एका मंडळाने पुढाकार घेत बैठक बोलावली. या बैठकीला जे निर्णय घेवू शकत नाहीत, अशांना सर्व मंडळाच्या नेत्यांनी पाठवले. बैठकीत छान छान चर्चा झाल्यानंतर बोलता बोलता दोन मंडळाच्या नेत्यांमध्ये जुंपली. अखेर हे प्रकरण बाचाबाचीपर्यंत ताणले गेले असल्याची चर्चा शिक्षकांच्या वर्तुळात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या