अहमदनगर । प्रतिनिधी| Ahmednagar
नगर-मनमाड महामार्गावरील पत्रकार चौकात असलेल्या कोहिनूर कॉम्प्लेक्स या इमारतीत असलेले श्रवणयंत्राचे दुकान शनिवारी दुपारी 12च्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाले. त्याच्याशेजारी असलेल्या बंदूकघर दुकानालाही या आगीची थोडी झळ बसली. मनपाच्या अग्निशामक दलाने तब्बल तासभर पाण्याचा मारा करून ही आग विझवली. दरम्यान, आग कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, ती वेळीच आटोक्यात आणली गेल्याने या इमारतीच्या फ्लॅटसमध्ये राहणार्यांवरील संकट टळले.
कोहिनूर कॉम्प्लेक्स इमारतीच्या खालच्या बाजूला व्यावसायिक दुकाने आहेत. तेथील श्रवण यंत्राच्या दुकानातून दुपारी 12 च्या सुमारास धूर येत असल्याने परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना व मनपा अग्निशामक दलाला कळवले. पोलिसांनी तातडीने तेथे येऊन बघ्यांची गर्दी हटवली व मनपाचे अग्निशामक दलही त्याचवेळी पोहोचले व त्यांनी पाण्याचा दुकानाच्या शटरवर मारा केला व नंतर महत्प्रयासाने ते उघडले. त्यातून धूर व ज्वाळांचा लोट बाहेर आला. त्यानंतर सुमारे तासभर पाण्याचा अखंड मारा करून आग आटोक्यात आणली गेली. या दुकानाशेजारीच बंदूक घर नावाचे दुकान आहे. तेथील बुलेटस व बंदुकींचा आगीच्या उष्णतेमुळे स्फोट होण्याची भीती असल्याने मनपा अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ व त्यांच्या सहकार्यांनी धाडसाने आत जाऊन तेथील सर्व साहित्य बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
आगीच्या ज्वाळा बाहेरपर्यंत येत असल्याने कोहिनूर कॉम्प्लेक्स इमारतीत वर राहणारेही व या श्रवणयंत्र दुकानाशेजारील अन्य दुकानदारही हवालदिल झाले होते. मात्र, अग्निशामक विभागाने आग आटोक्यात आणल्याने त्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. आग आतल्याआत धुमसत होती, दुपारी 12 च्या सुमारास धूर दिसू लागल्यावर आग लागल्याचे समजले. या आगीत दुकानातील फर्निचर व अन्य प्लायवूडचे साहित्य जळून खाक झाले आहे.