Thursday, September 12, 2024
Homeनगरनिर्भया पथकांकडून महाविद्यालयांच्या गेटवर तपासणी

निर्भया पथकांकडून महाविद्यालयांच्या गेटवर तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)

2 ऑगस्ट रोजी येथील रेसिडेन्सिअल महाविद्यालच्या गेटवरच युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या भरोसा सेलच्या निर्भया पथकाने शुक्रवारी (दि. 4) सकाळीच नगर शहरातील महाविद्यालयाच्या गेटवरच विद्यार्थ्यांची तपासणी केली. तसेच परिसरात फिरणार्‍या विना परवाना वाहन चालक, ट्रिपल सिट, फॅन्सी नंबर प्लेट, महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नसतानाही आवारात फिरणारे टवाळखोर मुले अशा 68 जणांविरूध्द कारवाई केली. तसेच 15 वाहनांवर केलेल्या कारवाईतून 11 हजार 500 रूपयांचा दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

किरकोळ कारणातून 2 ऑगस्ट रोजी रेसिडेन्सिअल महाविद्यालयाच्या गेटवर चास (ता. नगर) येथील एका युवकावर कोयत्याने जीव घेणा हल्ला करण्यात आला होता. यामुळे महाविद्यालय व परिसरातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला. याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भरोसा सेलची गुरूवारी (दि. 3) झाडाझडती घेतली. भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक पल्लवी उबरहंडे व त्यांच्या दामिनी पथकाने यापूर्वी केलेल्या कामगिरीची माहिती निरीक्षक आहेर यांनी घेतली. भरोसा सेलचे तीन निर्भया पथके तयार करून महाविद्यालय परिसरात कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

प्रत्येक पथकात तीन महिला व एक पुरूष अंमलदार यांचा समावेश केला. या पथकांनी शुक्रवारी (दि. 4) सकाळीच शहरातील न्यू आर्ट्स, रेसिडेन्सिअल महाविद्यालय तसेच सिध्दी बाग परिसरात साध्या वेशात प्रवेश केला. विद्यार्थ्यांची तपासणी केली. महाविद्यालच्या बाहेर फिरणारे टवाळखोर तसेच विना परवाना दुचाकी चालविणारे, ट्रिपल सिट, फॅन्सी नंबर प्लेट असणार्‍यांवर कारवाई केली. यामुळे महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणार्‍यांना चांगलाच चाप बसला आहे. सदरची कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सदरची कामगिरी सहा. निरीक्षक उबरहंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार, एस.के.शेख, बी.बी.पोकळे, के.लेंडाळ, एस.व्ही.कोळेकर, एस.टी.डिघुळे, महिला पोलीस अंमलदार एस.बी.औटी, ए.के.विधाटे, एस.एस.ढवळे, आर.आर.ठोंबे, एम.बी.पुरी, एस.व्ही.रोहोकले यांच्या पथकाने केली आहे.

विद्यार्थींनींशी साधला संवाद

दामिनी पथकाने महाविद्यालयासह शहरातील शाळा, कॉलेज, बस स्थानक परिसराला भेट देऊन तेथे उपस्थित असणार्‍या विद्यार्थींनींशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही अडचण असल्याच निर्भय पथकाचे मोबाईल नंबर 9370903143 व डायल 112 नंबरवर फोन करण्याबाबत माहिती दिली. शाळेतील शिक्षकांशी चर्चा करून सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, ओळखपत्र सक्तीचे करणे, टवाळखोर मुले संशयितरित्या आढळून आल्यास पथकाला संपर्क करण्याच्या सूचना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या