अहमदनगर (प्रतिनिधी)
पावसाच्या धडाकेबाज सुरूवातीनंतर नगर जिल्ह्यात यंदा जूनअखेरच खरीप हंगामील पेरण्या सुसाट असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी शेवगाव तालुक्यात सरासरीच्या 104 टक्के झाली आहे. तर दुसरीकडे उत्तर नगर जिल्ह्यातील बागायात भाग असणार्या अकोले, राहाता, कोपरगाव तालुक्यात पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या या 50 टक्क्यांच्या आत आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाने धडाकेबाज सुरूवात केली. विशेष करून नगर दक्षिणेत पावसाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे 28 जूनअखेर नगर जिल्ह्यात 72.72 टक्के म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या 4 लाख 21 हजार हेक्टरवर खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे बळीराजाच्या चेहर्यावर समाधान असले तरी पेरणी झालेल्या पिकांना अनेक ठिकाणी पाण्याची गरज असून मुसळधार नसला तरी मध्यम स्वरूपाच्या पावसाची सर्वांना प्रतिक्षा आहे. यंदा जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या लवकर आटोपणार असून 15 जूलैपर्यंत सर्वसाधारणपणे हंगामातील पेरण्याचा कालावधी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी हे शेवगाव तालुक्यात 104 टक्के असून तालुक्यात 54 हजार 886 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. यासह जामखेड तालुक्यात 95 टक्के तर कर्जत तालुक्यात 91 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. नेवासा तालुक्यात कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढत असून याठिकाणी 88 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. दुसरीकडे अकोले तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून पेरणी देखील 29.99 टक्के, राहाता 33.88 टक्के, कोपरगाव 49.29 टक्के आणि संगमनेर तालुक्यात 52.62 टक्के पेरण्या झालेला आहे. मागील वर्षी सुरूवातीला काही प्रमाणात झालेल्या पावसावर पेरण्याचे प्रमाण चांगले होते. मात्र, त्यानंतर पावसाने खंड दिल्याने खरीप हंगामील पिके करपून त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता.
यंदा त्यातुलनेत पावसाचे प्रमाण अधिक असून विशेष करून दुष्काळी ओळख असणार्या दक्षिण जिल्ह्यात ते अधिक आहेत. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या आतापर्यंत सुसाट आहेत. जिल्ह्यात 4 लाख 21 हजार 634 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.
तालुकाहनिहाय पेरणी कंसात टक्केवारी
नगर 28 हजार 85 हेक्टर (74.15 टक्के), पारनेर 36 हजार 898 हेक्टर (73.21 टक्के), श्रीगोंदा 19 हजार 316 हेक्टर (73.34 टक्के), कर्जत 47 हजार 462 हेक्टर (90.58 टक्के), जामखेड 46 हजार 763 हेक्टर (95.69 टक्के), शेवगाव 54 हजार 886 हेक्टर (104.21 टक्के), पाथर्डी 47 हजार 515 हेक्टर (79.12 टक्के), नेवासा 39 हजार 625 हेक्टर (88.28 टक्के), राहुरी 19 हजार 95 हेक्टर (69.30 टक्के), संगमनेर 26 हजार 755 हेक्टर (52.62 टक्के), अकोले 10 हजार 856 हेक्टर (29.99 टक्के), कोपरगाव 19 हजार 622 हेक्टर (49.39 टक्के), श्रीरामपूर 15 हजार 144 हेक्टर (64.47 टक्के), राहाता 9 हजार 612 हेक्टर (33.88 टक्के) असे आहे.
……………..