Friday, November 22, 2024
Homeनगरमनधरणीचा आज सुपर सन्डे!

मनधरणीचा आज सुपर सन्डे!

लोकसभा निवडणूक : लग्न तिथीमुळे उमेदवारांसह नेत्यांची होणार धावपळ

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकीची तारखी निश्चित झाली. दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करून आता माघारीची घटीका समिप आली आहे. उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा एकमेव दिवस असून निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांसमोर अन्य अपक्ष उमेदवारांची मनधरणी करून त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याचे आव्हान आहे. यासाठी त्यांच्या हातात आजचा रविवार हा एकमेव दिवस आहे. आधीच वाढलेला उन्हाचा कडाका त्यात मोठी लग्नतिथी यामुळे नेत्यांसह उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे.

अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार (दि. २६) दाखल अर्जाच्या छानणीनंतर एकूण ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात नगरमध्ये ३६ तर शिर्डीमधील २२ जणांचा समावेश आहे. नगर लोकसभेसाठी भाजप महायुतीच्यावतीने विद्यमान खा. डॉ. सुजय विखे पाटील मैदानात असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माजी आ. नीलेश लंके निवडणूक रिंगणात आहेत. यासह या मतदारसंघात ऐनवेळी एमआयएमने उडी घेतली असून यामुळे निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात देखील देखील सुरूवातील दुरंगी लढत होणार असे चित्र होते. मात्र, उमेदवारीवरून ऐनवेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत एन्ट्री केल्यामुळे याठिकाणी लढत तिरंगी आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

नगर आणि शिर्डी या दोनही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अपक्ष आणि लहानमोठ्या पक्षाच्यावतीने उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने याठिकाणी चांगलीच गर्दी झालेली आहे. यामुळे निवडणुकीतील प्रमुख पक्षासमोर या सर्वांना माघार घेण्यास भाग पाडण्याचे आव्हान आहे. या इच्छुकांनी माघार घेतल्यास प्रमुख उमेदवारांची निवडणूक सोपी होणार आहे. मात्र, यासाठी संबंधीतांसोबत करावयाच्या बोलणीसाठी आज एकमेव दिवस आहे. उद्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ ही माघारीसाठीची वेळ आहे. या कालावधीत संबंधीत इच्छुकांनी माघार न घेतल्यास ते थेट निवडणूक रिंगणात राहणार आहेत. याचा कमी अधिक प्रमाणात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना फटका बसणार असल्याने कोण कोणासाठी माघार घेणार अथवा कोण कोणाविरोधात जास्तीजास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून बाढलेले तपमान, आग ओकणाऱ्या र्यामु‌ळे अंगाची लाहीलाही सुरू आहे. त्यात आज मोठी लग्नतिथी असल्यामुळे भेटी गाठी आणि बोलणीसाठी आजचा दिवस प्रमुखांसह नेते आणि उमेदवार यांच्यासाठी सुपर ‘सन डे’ ठरणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचा तिसरा आणि महत्वाचा टप्पा सुरू होणार असून उद्या, सोमवारी दुपारी ३ नंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू होणार असून १३ तारेखाला मतदान होवून प्रचारांचा चौथा टप्पा पूर्ण होणार आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर या दोनही लोकसभा मतदारसंघात रंगतदार निवडणूक होणार असून याठिकाणी वंचित आणि एमआयएम यांच्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.

नगर लोकसभेसाठी ३६ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून शिर्डीत २२ अर्ज वैध आहेत. यातील कोण-कोण उमेदवार शेवटपर्यंत आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवणार, कोण माघार घेणार हे स्पष्ट झाल्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप होवून प्रत्यक्षात त्यांच्या प्रचाराला सुरूवात होणार आहे. नगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्या नावाशी साम्य असणारा आणखी एक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला असून हा उमेदवार अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार हे उद्या दुपारी स्पष्ट होणार आहे.

हेडफोन, रोबोट, मोबाईल चार्जर अन् डिश अँटिना; अपक्षांसाठी आधुनिक उपकरण चिन्हांचा पर्याय

१३ मे रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांचे ६, तर प्रादेशिक पक्षांचे ५ चिन्ह वगळता अपक्षांसाठी १५० चिन्ह खुले ठेवले आहेत. अपक्ष उमेदवारांसाठी पारंपारिक सोबत आधुनिक उपकरणांचे चिन्ह उपलब्ध करण्यात आली आहेत. यात सीसीटीव्ही कॅमेरा, हेडफोन, रोबोट, मोबाईल चार्जर, एक्सटेंशन बोर्ड, बॅटरी टॉर्च, डिश अँटिना आदींचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे निवडणूक चिन्ह हे राखीव आहेत. आम आदमी पक्ष, झाडू, बहुजन समाज पक्ष हत्ती, भारतीय जनता पक्ष कमळ, कम्युनिस्ट पक्ष विळा आणि तारा, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हाताचा पंजा, नॅशनल पीपल्स पक्ष पुस्तक हे चिन्ह राखीव आहेत. प्रादेशिक पक्षांसाठी पाच चिन्ह राखीव आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजिन, शिवसेना धनुष्यबाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राखीव आहेत. या चिन्हांसाठी पक्षाचा एबीफॉर्म आवश्यक आहे. अपक्षांसाठी १५० चिन्ह खुले आहेत. या चिन्हांमध्ये पारंपरिक चिन्हांचाही समावेश आहे. कपाट, जहाज, नारळाचे झाड, गॅस सिलिंडर, काडेपेटी, कलिंगड, सफरचंद, कलर ट्रे, गॅस शेगडी, माईक, रेफ्रिजरेटर, पाण्याची टाकी, ऑटो रिक्षा, फळा, संगणक, इस्त्री, मिक्सर, सितार, विहीर, मनुष्य व शीडयुक्त नाव, कॅरम बोर्ड, रोडरोलर, टेबल, ट्रक, फुगा, पेटी, खाट, किटली, शिट्टी, कॅमेरा, रूम कुलर, दूरध्वनी, टी. व्ही, कुकर, बॅट ही चिन्हे आहेत. नवीन चिन्हांमध्ये यंत्रमानव, पेट्रोल पंप, नुडल्स वाडगा, कटिंग प्लायर्स, रबर स्टॅप, सोफा, टेनिस रॅकेट आणि बॉल, टायर्स, व्हॅक्यूम क्लिनर, लॅपटॉप, डिझेल पंप, स्टॅपलर, व्हॉयोलीन, स्टेस्थोस्कोप, केक, टॉफीज, पाकीट, स्टमस, पेनड्राईव्ह, डोअर बेल, कॅल्क्युलेटर आदींचा समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या