Saturday, May 4, 2024
Homeनगरनगर एमआयडीसीत चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला

नगर एमआयडीसीत चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर एमआयडीसीत एका बॅटरी व इन्व्हर्टरचा साठा असलेल्या गोडाऊनमधून सुमारे 15 ते 16 लाख रुपये किमतीच्या बॅटर्‍या व इन्व्हर्टरची चोरी होऊन देखील याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. नगर शहरातील चितळे रोडवर या बॅटरी व इन्व्हर्टरच्या एजन्सी मालकाचे दुकान असून एमआयडीसीतील एका ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाच्या कार्यालयाच्या पाठीमागे हे गोडाऊन आहे. याच ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाच्या कामगारांनी त्या बॅटर्‍या व इन्व्हर्टरची चोरी केली असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

एका प्रसिध्द कंपनीच्या बॅटरी व इन्व्हर्टरची नगर जिल्ह्याची एजन्सी नगर शहरातील एका व्यावसायिकाने घेतलेली आहे. त्याचे दुकान नगर शहरातील चितळे रोडवर आहे. तेथे माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने तो व्यावसायिक बॅटर्‍या व इन्व्हर्टर नागापूर एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये ठेवतो. त्या गोडाऊनच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर आहे. तसेच काही कामगार देखरेखीसाठी ठेवले आहेत. त्या गोडाऊनच्या समोर एका ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाचे कार्यालय आहे. त्या ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाचे अवैध धंद्याशी संबंध जोडले असून त्याची एमआयडीसी पोलिसांना पक्की माहिती देखील आहे. याच ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाकडे काम करणार्‍या आठ ते नऊ वाहन चालक, कामगारांनी बॅटर्‍या व इन्व्हर्टरचा साठा असलेले गोडाऊन फोडले.

संगणमताने यातील सुमारे 80 ते 85 बॅटर्‍या व इन्व्हर्टरची चोरी केली. हा सर्व चोरीचा माल कमी भावाने नगर शहरातील अनेक दुकानदाराला विकला. याची खबर गोडाऊनच्या मालकाला लागली. आपली बदनामी नको म्हणून ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाने त्याच्याकडील कामगाराला डांबून ठेवत चोरलेला माल परत करण्याचे सांगितले. हळूहळू व पोलिसांना याची खबर न लागता त्या ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाने कामगाराकडून माल काढून तो एजन्सी व्यावसायिकला परत केला आहे. दरम्यान हा सर्व प्रकार काही व्यक्तींना समजला असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याची खबर पोलिसांना लागली आहे. पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

चोरी करणार्‍याला ठेवले डांबून

ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाकडे काम करणार्‍या राहुरी व कर्जत येथील दोन वाहन चालकांना त्या एजन्सी चालक व ट्रान्सस्पोर्ट व्यावसायिकाने ताब्यात घेत डांबून ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून व त्यांना मदत करणार्‍या इतरांकडून त्या चोरीच्या बॅटर्‍या व इन्व्हर्टर परत घेतले जात आहेत. आपल्या व्यावसायाची बदनामी नको म्हणून त्या ट्रान्सस्पोर्ट चालकाने एजन्सी व्यावसायिकावर दबाव आणला असून पोलिसांत फिर्याद देण्यापासून रोखले आहे.

एक पोलीसही सहभागी ?

हा सर्व प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोकरीला असलेल्या पोलिसाला माहिती असून त्याच्या आशिर्वादाने या चोरीच्या प्रकरणाची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्या पोलीस कर्मचार्‍याच्या मध्यस्थीने दोन व्यावसायिकांमध्ये तडजोड झाली आहे. यात मोठी आर्थिक तडजोड झाली असल्याची जोरदार चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या