Saturday, May 4, 2024
Homeनगरनगर : आंदोलनकर्ते विद्यार्थी पोलीसांच्या ताब्यात

नगर : आंदोलनकर्ते विद्यार्थी पोलीसांच्या ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा करोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला आहे.

- Advertisement -

या निर्णयाविरोधात नगरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला. दरम्यान, निषेध करणार्‍या 12 विद्यार्थ्यांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. समज देऊन त्यांना नंतर सोडून देण्यात आले.

बालिकाश्रम रोड येथून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. मोर्चामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा निलक्रांती चौका आल्यावर आंदोलकांनी रास्ता रोको करण्याची भूमिका घेतली. मात्र पोलिस प्रशासनाच्या आवाहनानंतर सामंजस्य दाखवत निलक्रांती चौकातच आंदोलकांनी ठिय्या मांडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना तीव्र भावना व्यक्त केल्या. एमपीएससीचा निर्णय अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची वाट मोकळी करून द्यावी असा एकसुरी आवाज आंदोलक विद्यार्थ्यांचा होता.

यानंतर सायंकाळी 15 ते 20 विद्यार्थ्यांनी दिल्लीगेट येथे आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्याठिकाणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी 12 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. यावेळी विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र होत्या. एमपीएससीची परीक्षा तीन ते चार वेळा रद्द करण्यात आली. वारंवार परीक्षा रद्द केल्याने काही विद्यार्थ्यांचे वय नियमांच्या पुढे जात आहे. यामुळे त्यांना परिक्षेला मुकावे लागेल. युपीएससीची परिक्षा होते तर एमपीएससीची परीक्षा का होत नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या