Friday, November 15, 2024
Homeनगरनगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

नगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

रात्री पावणे नऊनंतर सवारी वेशीबाहेर || पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरममधील हसन व हुसेन यांच्या सवारीची ‘कत्तलची रात्र’ व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. या दोन्ही मिरवणुका रेंगाळल्या. कत्तलची रात्र मिरवणूक मंगळवारी रात्री बारा वाजता सुरू झाली. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सवारी कोठल्यात पोहचली. त्यानंतर दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली. रात्री पावणे नऊनंतर सवारी दिल्लीगेट वेशीबाहेर पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने मिरवणूक शांततेत पार पडली.

- Advertisement -

दोन्ही मिरवणुका पारंपरिक मार्गाने काढण्यात आल्या. त्यासाठी 65 अधिकारी व 641 कर्मचारी असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी मध्यरात्री कोठलामधून छोटे इमाम व मंगलगेट हवेली भागातून बडे इमाम यांच्या सवार्‍यांची ‘कत्तलची रात्र’ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पाच टेंभ्यांना परवानगी देण्यात आली होती. मध्यरात्री 12 वाजता मिरवणुकीस सुरूवात झाली. मंगलगेट हवेली- दाळ मंडई- तेलीखुंट- शहाजीरस्ता- मोचीगल्ली- जुना बाजार- अर्बन बँक रस्ता- आनंदी बाजार- कोर्टगल्ली- सबजेल चौक- जुनी महापालिका- पंचपीर चावडी- धरती चौक- हातमपुरा- रामचंद्र खुंट मार्गाने सवार्‍या सकाळी पुन्हा आपापल्या जागी नेण्यात आल्या.

बुधवारी दुपारी 12 वाजता विसर्जन मिरवणुकीला पुन्हा सुरूवात झाली. दोन्ही सवार्‍या खेळवत पारंपरिक मार्गाने नेण्यात आल्या. विविध ठिकाणी भाविकांकडून त्यावर फुलांची चादर चढविण्यात आली. सरबताच्या गाड्यांना जुन्या महापालिकेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही मिरवणूक रेंगाळली. रात्री पावणे नऊनंतर सवारी दिल्लीगेट वेशीबाहेर पडली. रात्री उशिरा सावेडी गावात सवार्‍यांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, दरवर्षी मिरवणूक रेंगाळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षीही मिरवणूक रेंगाळली होती. यापूर्वी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सवारी वेशीबाहेर पडत होती. दरम्यान, कत्तलची रात्र मिरवणुकीपूर्वी रात्री खासदार नीलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांनी सवार्‍यांचे दर्शन घेतले. दोघेही एकाच वेळी कोठल्यात पोहचल्याने पोलीस दक्ष झाले होते. यावेळी लंके समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या