अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर महापालिकेच्या आयुक्त पदावर देविदास पवार यांची झालेली नियुक्ती अवघ्या दीड दिवसात रद्द करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक आयुक्त व यापूर्वी नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केलेले यशवंत डांगे यांची आता नगर महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाने बुधवारी दुपारी हे आदेश दिले आहेत.
बांधकाम परवानगीसाठी आठ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तत्कालीन आयुक्त पंकज जावळे व स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून दोघेही पसार आहेत. शासनाने आधी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवला होता. त्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा अमरावती येथील अतिरिक्त आयुक्त देविदास पवार यांची आयुक्त पदावर नियुक्ती केली. मात्र, अवघ्या दीड दिवसातच त्यांची नियुक्ती रद्द करून डांगे यांची नियुक्ती केली आहे.
डांगे हे सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते नगर महापालिकेत उपायुक्त होते. त्यांच्याकडे अमृत पाणी व भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा, प्रकल्प, घनकचरा, विद्युत, आरोग्य अशा प्रमुख विभागांची जबाबदारी होती. करोना महामारीच्या दुसर्या लाटेत त्यांची नगरला नियुक्ती झाली होती.
शहर काँग्रेसकडून आक्षेप
दरम्यान, डांगे यांच्या नियुक्तीवर नगर शहर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणार्या देविदास पवार यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती. मात्र, पवार यांच्याऐवजी उपायुक्त म्हणून वादग्रस्त ठरलेल्या यशवंत डांगे यांना आयुक्तपदी बसवण्यासाठी राजकीय ताकद वापरण्यात आली. सरकारने डांगे यांच्या नियुक्तीचा फेरविचार करत नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.