अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाला वेग आला आहे. जुन्याच दरानुसार मालमत्तांची पुन्हा मोजमापे घेऊन पुनर्मूल्यांकन केले जात आहे. आत्तापर्यंत 1818 मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातील 525 मालमत्तांच्या क्षेत्रात तब्बल 30 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. नगर शहरात सध्या 1 लाख 32 हजार मालमत्ता आहेत. त्यातील बहुतांशी जुन्या मालमत्तांना सुमारे वीस वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या मोजमापनुसार कराची आकारणी सुरू आहे.
महापालिकेने मालमत्ता करात वाढ केली नसली, तरी अस्तित्वातील मालमत्तांची नव्याने मोजमापे नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. अनेक मालमत्तांच्या जुन्या नोंदीतील मोजमापे व सध्याची परिस्थिती यात मोठी तफावत आहे. त्यामुळे खासगी संस्थेमार्फत शहरात सर्वेक्षण करून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. खासगी संस्थेने आत्तापर्यंत 1818 मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. त्यातील 525 मालमत्तांच्या जुन्या क्षेत्रात सुमारे 30 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. इतर मालमत्तांची नोंद सुरू आहे. दरम्यान, सर्वेक्षण पूर्ण होण्यास वर्षभराचा अवधी लागणार आहे.