अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बोल्हेगाव, नागापूरचा पाणी प्रश्न गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदने, बैठका घेतल्या. तसेच पाण्याच्या टाकीवरती जाऊन सूचनाही केल्या. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्यापपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक कुमार वाकळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भव्य मोर्चा काढला. यावेळी महिलांनी महापालिकेच्या दारात माठ फोडून प्रशासनाचा निषेध केला.
नगरसेवक वाकळे म्हणाले, नागापूर बोल्हेगावचा पाणी प्रश्न प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तीव्र स्वरूपाचा बनला आहे. आठ ते दहा दिवसांपर्यंत पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. प्रभागातील नागरिकांनी फेज टू पाणी योजनेचे कनेक्शन घेण्यासाठी पैसे भरले. मात्र त्यांना त्याद्वारे पाणी दिले जात नाही. नियोजनाच्या अभावामुळे हा प्रश्न सुटला जात नाही.
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही. पुढील काळामध्ये जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर नगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून टाकू, पाणी आम्हाला नाही तर कोणालाच नाही, असा इशारा यावेळी नगरसेवक वाकळे यांनी प्रशासनाला दिला. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. व नागापूर बोल्हेगावचा पाणी प्रश्न सुरळीत करू, असे आश्वासन उपायुक्त यशवंत डांगे यांनी आंदोलकांना दिले.