Wednesday, July 24, 2024
Homeनगरनगर-नाशिकच्या धरणांतून 8.6 टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडणार

नगर-नाशिकच्या धरणांतून 8.6 टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडणार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

अखेर मराठवाड्यातसाठी नगर, नाशिक च्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश आले आहेत. नगर, नाशिकच्या धरणातून एकूण 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकानी काढले आहेत. हे पाणी 31 ऑक्टोबरपर्यंत सोडावे, असे आदेशात म्हटले असले तरी हे आदेश काल दि. 30 रोजी काढण्यात आल्याने पाणी सोडण्याच्या प्रक्रियेस काही काळ लागणार आहे.दरम्यान जलसंपदा विभागाला आदेश प्राप्त झाले आहेत. पाणी सोडण्याबाबत नियोजनही सुरू केले असल्याची माहिती समजली आहे.

नगर जिल्ह्यातील मुळा (मांडओहोळ, मुळा) या धरणसमुहातून 2.10 टीएमसी, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) या धरणसमुहातून 3.36 टीएमसी, असे नगरच्या धरणांमधून 5.46 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तर नाशिकच्या गंगापूर धरण समुहातुू (गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी) 0.5 टिएमसीपाणी सोडावे लागणार आहे. दारणा धरण समुहातुन (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) 2.643 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. असे नाशिक च्या धरणातुन 3.143 टिएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

सन 2012 पासुन समन्यायी पाणी वाटप कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता पर्यंत जायकवाडीसाठी वरील धरणांमधुन 5 वेळा पाणी सोडण्यात आले आहे. ज्या ज्या वर्षी जायकवाडी जलाशयामध्ये तुटीचा पाणीसाठा झाला असेल त्या त्या वर्षासाठी समन्यायीची कार्यवाही होते. ही कार्यवाही गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हे करतात. यंदा जायकवाडीत 17 आक्टोबरचा पाणीसाठा आणि खरीप हंगामातील पाणी वापर असा एकूण संकल्पीत पाणीसाठा 57.25 टक्के इतका झाला. तो 65 टक्के असायला हवा. तो 65 टक्क्यापेक्षा कमी असल्याने उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील धरण समुहातील पाणी पैठण धरणात सोडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जायकवाडीत यावर्षी 44 टिएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला होता. समन्यायी प्रमाणे 6 टीएमसी पाणी कमी होते. त्यामुळे वहन व्यय गृहीत धरून 8.60 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश झाले आहेत.

वहन व्यय नगर, नाशिक मधील धरण साठ्यावर टाकला जातो. पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करणे, पाणी सोडण्याच्या प्रक्रियेत पोलिस बंदोबस्त, क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या नेमणूकीचे आदेश, वीज मंडळाला वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नगर, नाशिक, व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या अधिकार्‍यांना आदेशीत करणे, नदी प्रवाहातील अडथळे दूर करणे आदी गोष्टी कराव्या लागणार असल्याने यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागु शकतो. त्यानंतरच पाणी सोडण्याबाबतची प्रक्रिया सुरु होईल. पाणी सोडण्यापूर्वी नदीपात्रातील सर्व कोल्हापूर पध्दतीचे बंधार्‍यांचे दरवाजे काढावे लागणार आहेत. व पाणी बंद झाल्यावर पुन्हा बसवावे लागणार आहेत. तसेच बंधार्‍यात पाणी सोडण्याच्या अगोदर असणारा पाणीसाठ्या इतकाच पाणीसाठा नंतर राहिल अशा तर्‍हेचे नियोजन केले जाणार आहे. तसेच यासाठी खास पथके तयार करुन या विसर्गावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

पाणी सोडण्याचा फटका सर्वाधिक गोदावरी च्या कालव्यांना बसणार आहे. यापूर्वी जायकवाडीला पाणी न सोडता गोदावरी कालव्यांचे फक्त साडेतीन आवर्तने झाली आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर व पाच किमीची अट ठेवून मर्यादित क्षेत्रापर्यंत पाणी देण्याचे नियोजन करुन जेमतेम चार रोटेशन पर्यंत मजल मारलेली आहे. परंतु यावर्षी साडेतीन रोटेशन पैकी एका रोटेशनचे पाणी कमी होणार आहे. त्यामुळे अडीच रोटेशन होऊ शकतील. पाण्याचा काटकसरीने वापर व मर्यादीत क्षेत्र गृहीत धरले तर तीन रोटेशन होतील अशी शक्यता आहे. परंतु शक्यता गृहित असली तरी मागील वेळी लाभक्षेत्रात चांगला पाऊस असल्याने कालव्याबरोबरच विहिरीचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध होते. परंतु यावर्षी दुहेरी संकट आहे. लाभक्षेत्रात सरासरीपेक्षा पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याने पावसाळ्यातच विहीरी कोरड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे मागील वर्षांप्रमाणे यावर्षी पिकांना विहीरीच्या पाण्याचा आधार असणार नाही. त्यामुळे लाभधारकांना 100 टक्के गोदावरी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

पूर्वी तीन रोटेशन जरी कालव्यांची मिळाली तरी विहीरीवरील दोन पाणी तरी पिकांना देत असत, पिके निघायची. परंतु आजची परिस्थिती तशी नाही. विहीरी कोरड्या आहेत. विहिरीवर आवलंबून असेल तर पिके कशी होणार आहे? गव्हाला पाच पाणी जरी म्हटले तरी दोन पाणी देण्याची क्षमता विहीरीमध्ये आहे का? कालव्याचे तीनही रोटेशन रब्बीत घेवून चालेल का ? उन्हाळ्यात पाण्याचे काय ? दोन तरी पाणी उन्हाळ्यात लागणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्रपणे एक किंवा दोन आवर्तन घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्याला फटका बसणार आहे. पाण्याचे सुक्ष्म आणि कार्यक्षम नियोजन करणे आवश्यक आहे. मुख्यतः वहन व्यय नियंत्रण आणि पाणी चोरी यावर कडक बंधने घातली गेली पाहिजे. कालवा सल्लागार समिती बैठक लवकरात लवकर घेऊन याबाबत सर्वांगीण चर्चा होणे अपेक्षित आहे. जेणेकरून लाभधारकांना पुढील नियोजन करता येऊ शकेल.

दारणा समुहात भाम, भावली, वाकी तसेच अंशतः मुकणे या धरणातील जवळपास 11 टीएमसी पाणी जलद कालव्यातून मराठवाड्यातील गंगापूर, वैजापूर तालुक्यासाठी दिले जाते. दारणा समुहातुन सोडल्या जाणार्‍या पाण्यात मराठवाड्यासाठी असलेल्या या धरणांतून किती पाणी सोडले जाणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख नाही. यासंदर्भात खातरजमा होणे आवश्यक आहे. जायकवाडीसाठी सोडण्यात येणार्‍या पाण्याचा भार या धरणांवरही टाकला पाहिजे जेणेकरून गोदावरी कालव्यांना काहीसा दिलासा मिळेल. या महत्त्वाच्या मुद्याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे .

नोव्हेंबर ते जून असे 8 महिने पिण्याच्या पाण्याचे पूरवावे लागेल. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राला याबाबत मोठी चिंता आहे. मुळा धरणाचे 2.10टीएमसी पाणी जात असल्याने लाभधारकांना एका रोटेशनचा फटका बसणार आहे. मुळा प्रकल्पाची स्थितीही फार चांगली नाही. परंतु गोदावरी पेक्षा बरी आहे. प्रवरा समुहात मागील वर्षी 5.5 टीएमसी पाणी शिल्लक होते. यावर्षी जायकवाडीला यावर्षी प्रवरा समुहाला 3.36 टीएमसी पाणी देणे आहे. त्यामुळे त्यांना फरक फारसा फरक पडेल असे वाटत नाही. निळवंडेच्या कालवा प्रणाली अद्याप तयार नाही. या समन्यायी कायद्याचा मोठा फटका गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्राला बसणार आहे.

यावर्षी नगर, नाशिक मधील घाटमाथ्यावरील धरणे शंभर टक्के भरलेली असली तरी लाभक्षेत्रात पन्नास टक्के पेक्षाही कमी पाऊस झाल्याने भुजल पातळी खालावली जाऊन पावसाळ्यात सुध्दा विहीरी कोरड्या आहेत.

यावर्षी पिण्यासाठी जादा पाणी लागणार आहे. ही क्षेत्रीय परिस्थिती विचारात घेऊन नगर नाशिक मधुन पाणी सोडण्याऐवजी खास बाब म्हणून जायकवाडीच्या मृत साठ्यातून 6 टीएमसी पाणी जागच्या जागी वापरणे शक्य होते. सन 2017-18 मध्ये 8 टीएमसी पाणी मृत साठ्यातून वापरले होते . आज मितीला 6 टीएमसी पाण्यासाठी वहनव्ययासह 8.60 टूएमसी पाणी सोडणे भाग पडत आहे. कायद्या असला तरी केवळ धरणसाठ्यांची टक्केवारी न पहाता त्याबरोबरच क्षेत्रीय परिस्थिती सुध्दा बघितली जावी. यासंदर्भात फक्त टंचाई वर्षातच चर्चा होते . गेली चार वर्षे या आघाडीवर असलेली शांतता चिंताजनक आहे.

– उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग

या धरणांतून असे पाणी सोडण्याचे आदेश –

1) भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर 3036 दलघफू

2) मुळा धरण मांडओहळ 2010 दलघफू

3) दारणा, गंगापूर, मुकणे, भावली 2643 दलघफू

- Advertisment -

ताज्या बातम्या