Monday, June 24, 2024
Homeनगरनगर, नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याची टांगती तलवार

नगर, नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याची टांगती तलवार

पैठण |प्रतिनिधी| Paithan

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. निळवंडे आणि मुळा धरणात समाधानकार पाणी साठा आहे. मात्र, मराठवाड्याची तहान भागवणार्‍या जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रात पाऊस गायब आहे. यामुळे सध्या जरी जायकवाडीवाडीतून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असले तरी महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण कायदा 2005 तरतूदीनूसार 15 ऑक्टोबरच्या स्थितीनूसार जायकवाडी धरणाच्यावर असणार्‍या नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून खाली सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात वरुण राजा प्रसन्न न झाल्यास नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची टांगती तलवार कायम राहणार आहे.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे, याबाबत जायकवाडी धरण कालवा समिती सदस्य व या भागातील लोकप्रतिनिधींची बैठक शनिवारी झाली. जायकवाडी धरणात सध्या 33 टक्के जीवंत पाणीसाठा उपलब्ध असून 728 दलघमी पाणी उपलब्ध आहे. यामधून संपूर्ण वजावट करून खरीप पिकाला पाणी देण्यासाठी 202 एमएमक्यू पाणी उपलब्ध आहे. यामधून ताबडतोब एक रोटेशन लगेच दिले पाहिजे. यानुसार 1 सप्टेंबरपासून रोटेशन सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हे रोटेशन 25 दिवस चालणार असून जवळजवळ 180 एमएमक्यू पाण्याचा वापर होणार आहे.

महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण कायदा 2005 (एमडब्लूआरआरए), 11/सी प्रमाणे 15 ऑक्टोबरला जायकवाडी धरणातील पाणी साठ्याची जी स्थिती असेल त्या स्थितीनूसारवरच्या नगर, नाशिक धरणातून पाणी सोडण्याची तरतूद आहे, त्यानुसार पाणी सोडण्यात यावे, असे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत. जायकवाडी धरणाच्या वरील सर्व धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यात निळवंडे 81.88 टक्के, भंडारदरा 100 टक्के, मुळा 81 टक्के, नांदूरमधमेश्वर 100 टक्के, पुणेगाव 88 टक्के, दारणा 93 टक्के, मुकणे 77 टक्के, वाकी 61 टक्के, भाम, भावली व बालदेवी तिन्ही धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे.वरील धरणातून 15 ऑक्टोबरची स्थिती बघून 65 टक्के पेक्षा जर जायकवाडी धरणाचा साठा कमी असल्यास वरील धरणातून पाणी सोडणे बाबतच्या तरतुदीनुसार पाणी सोडावे लागणार आहे. बैठकीत रब्बी पिकासाठी एक किंवा दोन परिस्थितीनुसार जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी देण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.

जालना जिल्ह्यातील अंबड- घनसावंगी व परतूर तालुक्यात पावसाचे प्रमाणे कमी आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीन, कापूस, मुग, उडीद, मका, बाजरी, तुर, ऊस आदी पिकांना जीवदान मिळणार आहे.तसेच अंबड-घनसावंगी व परतूर तालुक्यातील कालव्याच्या कार्यक्षेत्रातील कालवा परिसरातील बोअरवेल आणि विहीरीचे पुनर्भरण होण्यास देखील मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या