Saturday, July 27, 2024
Homeनगरमराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जावे, पण त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, अशी मागणी राज्यभरातील ओबीसींकडून होत असून, यादृष्टीने आंदोलन वा अन्य मार्गाने विरोध सुरू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर, नगरमधील ओबीसी संघटनांनीही येत्या दोन दिवसात बैठक घेण्याचे नियोजन सुरू केले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मागील 11 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. वंशावळीत उल्लेख असणारांना कुणबी दाखले देण्यास सरकारने सहमती दर्शवली आहे व तसा आदेशही जारी केला आहे. मात्र, आमच्याकडे वंशावळी नाहीत व या निर्णयाचा एक टक्काही फायदा आम्हाला होणार नसल्याचा दावा करीत जरांगेंनी हा आदेश नाकारून उपोषण सुरू ठेवले असून, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. मात्र, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी संघटनांनी विरोध सुरू केला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत.

नगरमधील ओबीसी संघटना पदाधिकार्‍यांनीही एकमेकांशी संपर्क साधून यादृष्टीने विचार करण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. नगरमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावता परिषद, व्हीजेएनटी-ओबीसी जनमोर्चा, माळी महासंघ, बारा बलुतेदार संघटना, अहिल्या देवी होळकर संघटना, श्रीसंत सावता माळी युवक संघ व अन्य काही संघटना असून, त्यांच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. येत्या दोन दिवसात सर्वांची एकत्रित बैठक घेऊन भूमिका ठरवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या