अहमदनगर/ पाथर्डी |प्रतिनिधी| Ahmednagar Pathardi
सोमवारी दुपारनंतर सायंकाळी उशीरापर्यंत नगर शहरासह परिसारात संततधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, काल दुपारी दक्षिण जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने हजेरी लावली असून पाथर्डी शहरात दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या गटारी तुंबल्या. तसेच कसबा विभागात असलेल्या अनेक घरात पाणी घुसले तर जानकीबाई अमरधामकडे जाणार्या रस्त्यावर एका खाजगी इसमाने उभा केलेला पूल वाहून गेला. श्रीरामपूर, संगमनेरातही सलग दुसर्या दिवशी पाऊस झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. राहुरी शहर आणि तालुक्याच्या विविध भागात पाऊस सुरू आहे.
सोमवारी दुपारी पाथर्डी शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दोन तास झालेल्या या पावसामुळे मात्र नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. शहराच्या कसबा विभागात खोलेश्वर मंदिर ते दक्षिणमुखी मारुती मंदिर असा रस्ता करण्यात आला असून या रस्त्यावर एका ठिकाणी छोटा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाखाली असलेल्या नळ्या तुंबल्यामुळे याठिकाणी पाणी साचले व हे पाणी या पुलालगत राहत असलेल्या पार्वती थोरात, गंगाराम थोरात यांच्यासह अनेकांच्या घरात शिरले.
पार्वती थोरात यांच्या घरातील गॅसची टाकी सुद्धा या पाण्यात तरंगत होती. तर अनेकांच्या दुचाकी भोवती मोठे पाणी साचल्याने त्यांना दुचाकी सुद्धा पावसाचा जोर कमी होईपर्यंत पाण्यातून बाहेर काढता आल्या नाहीत. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. शहरात दोन स्मशानभूमी असून जानकीबाई स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावरील पूल पालिकेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केला. मात्र, अजूनही या पुलाचे काम पालिकेने सुरु न केल्याने या रस्त्यालगत राहणारे राम शिंदे यांनी पदरमोड करत या ठिकाणी एक छोटासा पूल बांधला व त्याच्या खाली नळ्या सुद्धा टाकल्या. मात्र, काल झालेल्या पावसामुळे हा पूल खचत वाहून गेल्याने आत स्मशानभूमीकडे जाणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, काल दुपारी दोन ते चारच्या दरम्यान नगरशहरासह परिसारात संततधार पाऊस झाला. झालेला पाऊस हा शहराच्या काही भागातच कोसळत होता. त्यानंतर काही वेळ पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा रात्रीच्या आठच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळ्या. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडे नोंद झालेल्या पावसात रविवारी जिल्ह्यात पाळशी 24, श्रीगोंदा 54, चिंभळा 34, देवदैठण 23, कोळगाव 20, कर्जत 35, जामखेड 54, खर्डा 32, नान्नज 30, नायगाव 54, भातकूडगाव 23, बोधेगाव 43, चापडगाव 88, मिरी 29, नेवासा खु. 26, नेवासा बु. 27, सलाबतपूर 38, कुकाणा 24, चांदा 88, समनापूर 31 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.