Friday, October 25, 2024
Homeनगरनगर, श्रीगोंदा, पारनेरवर पावसाची कृपा

नगर, श्रीगोंदा, पारनेरवर पावसाची कृपा

उत्तर नगर जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा वरूण राजाने कृपा दाखवल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. 14 जूनअखेर जिल्ह्यातील उत्तर भागातील तालुके वगळता दक्षिण जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि राहुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. तर उत्तरेतील राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, अकोले येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. दरम्यान, बुधवारी नगर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यावर पावसाने कृपा दाखवत मुसळधार हजेरी लावली. अनेक ठिकाणी बंधारे, ओढे, नाले 15 जूनच्या आत तुडूंब झाले आहेत.

- Advertisement -

यंदा गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. अनेक ठिकाणी काही तासात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार आहे. तर काही ठिकाणी पेरणीसाठी वापसा होण्यास पुढील काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. जिल्ह्यात दक्षिण विभागात यंदा पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. जिल्ह्यात 14 जून अखेर 127.6 टक्के सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. यात 200 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झालेल्या महसूल मंडलांची संख्या 15 असून यातील कर्जत तालुक्यातील राशिन मंडळात 362. 3 मि.मी. पावसाची आतापर्यंत नोंद झालेली आहे. सर्वात कमी पावसाची नोंद अकोले तालुक्यातील कोतुळ मंडळात अवघी 39.5 मि.मी. झालेली आहे. दरम्यान, बुधवारी दुपारपासून नगर शहरासह दक्षिणेतील श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले.

यात नगर तालुक्यात अनेक ठिकाणी धुव्वाँधार पाऊस झाला असून यामुळे ओढे, नाले तुंडूब भरलेले आहेत. या पावसामुळे खरीप हंगामासाठी पेरणी लायक पाऊस झाला असून येत्या काही दिवसात जिल्ह्यात पेरण्यांना सुरूवात होणार आहे. बुधवारी झालेला पाऊस नालेगाव 36, कोपूरवाडी 35, भिंगार 25, नागापूर 42, वाळकी 45.5., रुईछत्रपती 46.5, सुपा 39, टाकळी 29, श्रीगोंदा 34, काष्टी 46, मांडवगण 26, बेलवंडी 32, पेडगाव 46, चिंभळा 33, कोळगाव 30, राशिन 58, भांबोरा 28, नेवासा 21, सलाबतपूर 20.8, टाकळीमियॉ 21.3, पिंपरने 55.5, श्रीरामपूर 21, बेलापूर 36 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

दक्षिणेत कडधान्य वाढणार
नगर जिल्हा कडधान्य पिकवणारा भाग आहे. मान्सूनच्या सुरूवातीचा अथवा मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास त्यावर कडधान्य पिकाचे भवितव्य अवलंबून राहते. यंदा दक्षिणेत पाऊस जोरात असल्याने कडधान्य पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. विशेष करून पारनेर तालुक्यात वाटाणा पिकाचे क्षेत्र वाढणार असून तालुक्यातील ठरावीक गावात वाटाणा हे प्रमुख पीक असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या