संदीप जाधव | 9225320946
तत्त्व, निष्ठा जोपासताना अनेकदा कौटुंबिक घुसमटीला सामोरे जावे लागते. याचा नकारात्मक परिणाम मग कौटुंबिक स्वास्थ्यावर होतो. एका पुरोगामी नेत्याच्या जीवनात चळवळीला कमालीचे महत्त्व असते. कुटुंबाकडे होणार्या दुर्लक्षामुळे पत्नीच्या मनात चाललेली संघर्षाची समांतर चळवळ मात्र त्याला दिसत नाही. त्याचा होणारा परिणाम कुटुंबाला कोणत्या टोकाला घेऊन जातो. याचे चित्रण शुक्रवारी राज्य नाट्य स्पर्धेतील ‘समांतर’ या दोन अंकी नाटकात पाहायला मिळाले.
इरफान मुजावर लिखित या नाटकाचे दिग्दर्शक डॉ. संदीप येळवंडे यांनी केले. ग्रामीण कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी धडपडणारे डॉ. येळवंडे यांनी नाटक सादर करण्यासाठी कलाकारांकडून चांगली तयारी करवून घेतली, पण स्वतःच्या भूमिकेकडे जास्त लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळाला नसावा, असे वाटते. नाटकात दोनदा विजेच्या लपंडावामुळे अडथळा आला. शेवटच्या प्रवेशाआधीच चुकून पडलेला व नंतर पुन्हा उघडलेला पडदा प्रेक्षकांच्या खिल्लीचा विषय ठरला. संवादांच्या भडीमारामुळे अनेक प्रसंग रेंगाळले.
पडदा उघडताच मध्यवर्गीयाचे घर नजरेस पडते. भिंतीवरील सामाजिक विचारवंतांच्या फोटावरून ते घर पुरोगामी व्यक्तीचे लक्षात येते. आंनंदरावांचे ते घर असते. त्यांची पत्नी सुधा साधारण गृहिणी असते. तिचा दैवत्वावर विश्वास असतो. हे आनंदरावांना मान्य नसते, तरी देवपूजा करण्यास ते पत्नीला कधीही विरोध करीत नाही. आपली पुरोगामी चळवळ जोपासण्यातच त्यांचा सर्व वेळ खर्ची पडत असतो. त्यांचा 16 वर्षांचा मुलगा निनाद हा असाध्य रोगाने पीडित असल्याने अंथरूणाला खिळलेला असतो. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतात. त्याला होत असलेल्या त्रासाने त्याची आई म्हणजेच सुधा चिंतीत असते. मात्र, आनंदरावांना त्याचे फारसे सोयरसूतक नसते. त्याची काळजी घेण्यासाठी त्याचा मित्र अथर्व रोज त्याच्या घरी येत असतो.
निनाद आजारातून लवकर बरा व्हावा यासाठी सुधा पूजेचे आयोजन करते. मात्र, पूजेला सुरुवात झाल्यानंतर गुरुजींनी सांगूनही आनंदराव पूजा करण्यास नकार देतात. तितक्यात आनंदरावांच्या घराबाहेर हिंसक जमाव त्यांच्या एका पुस्तकाच्या विरोधासाठी जमा होतो. याच दरम्यान निनादला भयंकर त्रास होऊ लागतो. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आनंदराव प्रयत्न करतात. मात्र, बाहेरील जमावामुळे ते शक्य होत नाही. इकडे आनंदरावांनी पूजेला बसण्याचा आग्रह सुधा व गुरुजी करतात. मात्र, ते ऐकत नाहीत. पण सुधाचा कळवळा व निनादचा विव्हळणे पाहून त्या निर्णय बदलणार इतक्यात अॅम्ब्यूलन्स येते नि निनादला हॉस्पिटलला नेले जाते. त्यातून तो बचावतो. मात्र, नंतर घरी आणल्यावर निनादचा मृत्यू होतो. मग सुधा घर सोडून निघून जाते. असे कथानक ‘समांतर’ या नाट्यात दाखविले आहे.
दिग्दर्शनाबरोबर डॉ. संदीप येळवंडे यांनी नाटकात आनंदरावांची भूमिका केली. त्यांचा अभिनय चांगला वाटला असली तरी त्यांचे संवाद पुस्तकी भाषेतील होते. त्यामुळे संवादात कृत्रिमता जाणवली. इतर कलाकारांच्या अभिनयासाठी मार्गदर्शन करताना त्यांनी थोडे लक्ष स्वतःकडेली द्यायला हवे होते. गंभीर नाटक करणे तसे सोपे नसते. मात्र, डॉ. येळवंडे यांनी नाटक तडीस नेण्याचा चांगला प्रयत्न केला.
आनंदरावांची पत्नी सुधाची भूमिका डॉ. भावना रणशूर यांनी सुरेख बजावली. त्यांचे हावभाव आणि उच्चारातील योग्य चढउतार त्यांची भूमिका उजवी ठरण्यास कारणीभूत ठरला. त्यांच्या देहबोलीतही कमालीचा आत्मविश्वास जाणवला. पुरोगामी कार्यकर्ता संतोष याला मोहन औटी यांनी रंगमंचावर आणले. त्यांचेही संवाद अगदीच कृत्रिम वाटले. मधूनच त्यांची होणारी शारीरिक हालचाल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. त्यांचे हावभाव मात्र नैसर्गिक वाटले.
अथर्वची भूमिका तुषार वाघ याने चांगली वाजवली. त्याच्या संवादांनी प्रेक्षकांमध्ये अनेकदा खसखस पिकवली. तो एकदाही अडखळला नाही. मित्रासाठी असलेली चिंता त्याच्या निराश हावभावातून दिसली. पूजेसाठी घरात आलेल्या गुरुजींना योगेश रासने यांनी वठविले. त्यांना आलेला रागही नैसर्गिक वाटला नाही. एकदा ते संवाद विसरले. मंत्रोच्चार मात्र त्यांनी बिनदिक्कत पूर्ण केला. निनाद हे रंगमंचावर न दिसणारे पात्र होते. त्याचा केवळ आवाजच ऐकू आला.
रंगभूषेची जबाबदारी डॉ. सुुनील वैरागर, श्रीपाद शिंदे यांच्याकडे होती. वेशभूषा राजेंद्र पाटोळे व सुरेश चौधरी यांनी केली. सर्वांत चांगली वेशभूषा सुधाची वाटली. संतोष सामाजिक कार्यकर्ता नसून एखादा अधिकारीच वाटत होता. प्रसंगांनुरूप संगीत देण्याची जबाबदारी टी.एम. पवार व प्रीतम गायकवाड यांनी सांभाळली. जमावाचा आवाज चांगला वाटला. आनंदराव-सुधाच्या संवादावेळी आणखी प्रभावी पार्श्वसंगीत देता आले असते.
सोहम दायमा व अभय काळे यांनी प्रसंगानुरूप प्रकाश दिला. स्पॉट चांगले दिले. मात्र, काही प्रसंगात उशिरा लाईट लागले. दिलीप शिंदे व स्वप्नील नजन यांनी तंत्रसाहाय्य केले.
सर्वसामान्य घर, त्यातील देवघर, भिंतीवरील प्रतिमा, सोफासेट, गॅलरी असे मोजकेच नेपथ्य तुकाराम गवळी, नवनात कुर्हाडे, राज वैरागर यांनी चांगले सजविले होते. सुधानी आणलेलं भाजीचं ताट बर्याच वेळ एकाच जागेवर होतं, तर वर्तमानपत्र शेवटपर्यंत जागेवरच राहिला. निनादचा फोटोही उशिरा लावला. शेवटच्या प्रसंगात पडदा अवेळी पडल्यामुळे प्रेक्षक मात्र संभ्रमात पडले.