केवळ 13 घरफोड्यांचा तपास
अहमदनगर (प्रतिनिधी) – गतवर्षाच्या तुलनेत यंदा भिंगारमध्ये घरफोड्यांचे प्रमाण काहिसे घटले तरी तपास लावण्यात भिंगार पोलीस मात्र सपेशल फेल झाल्याचे दिसते आहे. केवळ 13 घरफोड्यांचा तपास करत पोलिसांनी ‘धीरे चल..’ सुरू असल्याचे दाखवून दिले. चोरी कधी अन् कशी होईल याचा नेम नसल्याने भिंगारकरांना स्वत:च स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे.
2018 मध्ये 89 चोर्या, घरफोडीच्या घटना भिंगार पोलिसांतर्गत नोंदविल्या गेल्या. यंदा त्यात घट होऊन 66 घरफोडी, चोर्यांचे गुन्हे नोंदले गेले आहेत. त्यातील केवळ 13 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 53 घरफोडीचे गुन्हे अजूनही तपासावर आहेत. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भिंंगारकरांना स्वत:च सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे.
घर बंद करून एखादा दिवस बाहेरगावी जाण्याची सोय आता राहिलेली नाही. माघारी येईपर्यंत घर सुरक्षित राहिल का? याची काळजी भिंगारकरांना सतावते आहे. सैनिक नगर, मुकूंदनगर, आलमगीर, सारसनगर परिसरातील काही भाग, दरेवाडी परिसराचा काही भाग भिंगार पोलीस ठाणे अंतर्गत येतो. या परिसराला चोरट्यांनी लक्ष करत वाहनचोरी, कार, मोबाईल लंपास करण्यासोबतच घरफोडीचेही ‘उद्योग’ केले आहेत.
गेल्या अकरा महिन्यात 32 घरफोडीच्या घटना घडल्या असून इतर गुन्हे हे चोरीचे असल्याची नोंद भिंगार पोलिसांच्या दप्तरी आहे. 32 घरफोड्यापैंकी एकाही गुन्ह्याची उकल भिंगार पोलिसांना करता आलेली नाही. भिंगार पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ पाहत आहे. रात्रीची गस्ती पथके कोठे जातात असा सवाल सर्वसामान्या भिंगारकर उपस्थित करत आहेत.
11 महिन्यात 66 चोर्या, लुटमार, 32 घरफोड्या तपास शून्य
कारभारी बदलले पण परिस्थिती तीच
घरफोड्या करून लाखोंचा ऐवज चोरटे लंपास करतात. घरफोडी झालेल्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटते. चोरांच्या मुसक्या आवळणे हे खरेतर पोलिसांचे काम, पण भिंगार पोलिसांचे त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे. 32 ठिकाणच्या घरफोडीच्या घटनेपैंकी एकही गुन्हा पोलिसांना उघडकीस आणता आला नाही. पोलीस ठाण्याचे कारभारी बदलेली तरी हीच परिस्थिती. त्यामुळे वरिष्ठांनीच आता भिंगार पोलिसांच्या तपासाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.