Saturday, July 27, 2024
Homeनगरभ्रष्टाचार दडपण्यासाठी अर्बन बँक बंद केली

भ्रष्टाचार दडपण्यासाठी अर्बन बँक बंद केली

अहमदनगर (प्रतिनिधी)

सर्वसामान्य नागरिकांना खासगी सावकारीच्या पाशातून मुक्त करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली नगर अर्बन बँक या सहकारी बँकेला भ्रष्टाचाराच्या हेतूने अनावश्यक बहुराज्यीय (मल्टीस्टेट) दर्जा घेतला गेल्याचा आरोप नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात केलेल्या तक्रारीत त्यांनी हा आरोप केला आहे. केलेला भ्रष्टाचार दडपण्यासाठी बँक बंद केल्याच्या घटनेची चौकशी समिती नेमून चौकशी केली जावी व दोषींना शासन केले जावे, अशा मागण्याही त्यांनी यात केल्या आहेत.

- Advertisement -

गांधी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवली आहे व ठेवीदार-सभासदांनीही अशा तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचे आवाहन केले आहे. 1910 ते 2013 पर्यंत या वैभवशाली संस्थेने सातत्याने प्रगती केली, परंतु 2013 साली भ्रष्टाचार करणे सोपे जावे म्हणून या संस्थेला बहुराज्यीय दर्जा (मल्टीस्टे) घेण्यात आला, असा दावा करून गांधी यांनी या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, यासाठी संस्थेच्या दप्तरी खोटे दस्तावेज तयार करण्यात आले. गुजरात राज्यातील बनावट 165 सभासदांची बनावट मागणी दाखवत व त्यांच्या खोट्या सह्या केल्या गेल्या. तसेच संस्थेच्या मृत सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती दाखवत आणि संस्थेच्या 25 पैकी 13 संचालकांचा विरोध असताना मल्टीस्टेट दर्जा घेतला गेला.

2013 पासून आजपर्यत सूरत व अहमदाबाद शहरातील केवळ 300-350 सभासद एवढेच या बँकेचे बहुराज्यीय (मल्टीस्टेट) अस्तित्व आहे. गुजरात राज्यातील सभासदांचा बँकेशी कुठलाही व्यवहार नाही व ते एकदाही बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेलाही आलेले नाहीत. तसेच ते सभासद खरे आहेत की बनावट आहेत, याची देखील पडताळणी झालेली नाही, असा दावा करून गांधींनी पुढे म्हटले आहे की, भ्रष्टाचार करायला सोपे जावे म्हणून हा बहुराज्यीय दर्जा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकार खात्याचे बँकेवरील नियंत्रण संपल्याचा गैरफायदा घेत भ्रष्टाचार करीत 2013 ते 2023 या दहाच वर्षात या वैभवशाली व ऐतिहासिक संस्थेला संपविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व कट कारस्थानाची योग्य चौकशी समिती नेमून चौकशी व्हावी व राज्याचा ऐतिहासिक वारसा संपविण्याचे पाप करणारांना योग्य शासन व्हावे, अशी मागणी गांधींनी यात केली आहे.

मान्यवरांनी केली उभारणी

गोरगरिब जनतेची खासगी सावकारी पाशातून मुक्ती होण्यासाठी (स्व.) गोपाल कृष्ण चितळे उर्फ रावबहाद्दूर चितळे यांचे नेतृत्वाखाली बँकेची स्थापना झाली आहे. महान व्यक्तींनी अतुलनीये योगदान देवून ही संस्था वाढविली. सात जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 15 हजार सभासदांना आर्थिक पाठबळ संस्थेने दिले. अशा संस्था राज्याचे भूषण व अभिमान होता. अशा संस्था पुन्हा पुन्हा उभ्या राहत नसतात, असेही गांधींनी या तक्रारीत नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या