नाशिक | प्रतिनिधी
जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करावेच लागेल. शिक्षणात अभिनव प्रयोग करणाऱ्या शिक्षण अभ्यासक, शिक्षक तज्ञांचे, प्रयोगशिल शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन शिक्षण क्षेत्रात दिशादर्शक काम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुरस्काराच्या रकमेचा उपयोग करून आपण समाजाच्या देणं लागतो, या भावनेतून सचिन जोशी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लर्निंग बस तयार केली. या बसचा फायदा महापालिका, जिल्हा परिषद, आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्य दिशेने जाताना आपल्या पुढील पिढीची जमिनीशी नाळ तुटणार आहे, याची काळजी घ्यायला हवी, असे मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
‘एज्युकेशन ऑन व्हील्स’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या आर्टिफिशल इंटेलिजन्स लर्निंग बसचे (AI on Wheel) लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आंतरराष्ट्रीय विचारवंत संदीप वासलेकर, खासदार भास्कर भगरे, प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी वाहतूक व सुरक्षा विभागाचे उपायुक्त भरत कळस्कर,पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, धर्मदाय उपायक्त विवेक सोनुने, आयकर विभागाचे सहआयुक्त हर्षद आराधी, शिक्षणतज्ञ रमेश पानसे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे श्रीराम शेटे, आर्मस्ट्राँग कंपनीचे चेअरमन विनीत माजगावकर, ऊर्जा फाउंडेशनचे अजय बोरस्ते, अविनाश जाधव, मविप्र सरचिटणीस ॲअॅड. नितीन ठाकरे, जितुभाई ठक्कर, शाम लोंढे, इलमस फतेहली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री भुसे पुढे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सचिन जोशी यांनी शिक्षणात यशस्वी प्रयोग केले आहे. हिवाळी शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याला देशाची घटना माहिती आहे. दोन्ही हातांनी विद्यार्थी लिहितात. गणितात अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा व आदर्श वर्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
आंतरराष्ट्रीय विचारवंत संदीप वासलेकर यांनी यावेळी सांगितले की, केवळ आभाळाकडे न बघता तळागाळात जाऊन उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न झाल्यास खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल. सचिन जोशी यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी अभ्यासगट तयार करून राज्य शासनाने त्याला शासकीय मान्यता दिल्यास माध्यमिक शिक्षणात ओरिएंटेशन आणण्यास मदत होईल.
दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, काही वर्षापूर्वी मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एकांकिका लिहिली. हा विषय खूप प्रसिद्ध झाला. अभिनव प्रयोगांमुळे या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन विद्यार्थी व पालकांचा बदलेल. प्रत्येक पुस्तक माणूस घडवत असते. शिक्षण व शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल व शाश्वत विकास करणाऱ्या, दूरदृष्टी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची गरज आहे. नाशिकच्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख तयार केली. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, असे मला वाटते. नाशिकचे जिवंतपणा असाच कायम ठेवा, असेही ते म्हणाले.
शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून ही ‘एआय लर्निंग बस’ साकारण्यात आली आहे. सचिन जोशी यांनी यावेळी सांगितले की, महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मोठी मदत होऊ शकेल. AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, कोडींग आणि रोबोटिक्स यासारख्या विषयांचे शिक्षण प्रत्यक्ष अनुभवासह मिळेल. विशेषतः, ग्रामीण भागातील आणि झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ होणार आहे. एमआयटीचे प्राध्यापक डॉ. रमेश रासकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत “ही बस भारतातील डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय ठरेल” असे गौरवोद्गार काढले आहे.
इस्पॅलिअर स्कूलच्या संचालिका डॉ प्राजक्ता जोशी यांनी सांगितले की, हा इस्पॅलिअर स्कूलचा सामाजिक उपक्रम असून तंत्रज्ञानातून शिक्षण क्रांती करण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वी ‘एज्युकेशन ऑन व्हील्स’ उपक्रमांतर्गत तब्बल 19 हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले आहे. आता AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक सुलभ व आधुनिक बनविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
जिल्हा परिषद व महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत एआय शिक्षण
इयत्ता ५ वी ते ७ वी मधील अनेक विद्यार्थी वाचन, लेखन आणि गणित यांसारख्या मूलभूत कौशल्यांमध्ये मागे पडतात. अशा विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्याची संधी मिळावी व त्यांची डिजिटल कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी ही एआय लर्निंग बस उपयुक्त ठरणार आहे. या बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी २ तासांची कार्यशाळा, १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण आणि १ महिन्याचा सखोल अभ्यासक्रम असे विविध टप्पे असतील. विशेष म्हणजे, महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अशी आहे एआय लर्निंग बस..
- रोबोटिक्स लॅब
- रेकॉर्डिंग स्टुडिओ
- ऑडिओ-व्हिडिओ कंटेंट निर्मिती – स्वतःचे व्हिडिओ आणि ध्वनीमुद्रण तयार करता येईल
- एआय शिकवणारे सर्व सॉफ्टवेअर
- २० टॅबलेटसह डिजिटल शिक्षण
- वर्च्युअल रियालिटीद्वारे (VR set) द्वारे पहिली ते दहावीचा संपूर्ण अभ्यासक्रम 3d
- इंटरऍक्टिव्ह बोर्ड
- थ्रीडी प्रिंटर
- लॅपटॉप
- २ मोठ्या एलईडी स्क्रीन
- अलेक्सा
- विविध थ्रीडी पेन
- १०० हून अधिक पुस्तकांची लायब्ररी
- इंटरनेट राऊटर
- पूर्ण बस वातानुकूलित (एसी)
- दोन जनरेटर सेट
- सोलर लाईट
- संपूर्ण बस सीसीटीव्ही अंतर्गत
- गुगल मीट, झूमद्वारे जगातील तज्ञ व्यक्तींशी विद्यार्थी संपर्क साधू शकतील.
या ‘एआय लर्निंग बस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा नव्याने आणि आधुनिक पद्धतीने आनंद घेता येईल!