छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar
शहरातील प्रत्येक ५ कि.मी. परिसरात हवेची गुणवत्तेची माहिती देणारी यंत्रणा (डिव्हाईस) लावण्यात येणार आहे. हवेच्या गुणवत्ते (quality) विषयी रिअल टाईम डेटा मिळेल. त्यातून आवश्यक उपाययोजना करता येतील. त्याबरोबर शहरातील प्रत्येक सिग्नलवर ‘बिल बोर्ड’ लावण्यात येतील. हे ‘बिल बोर्ड’ फुप्फुसाच्या आकारातून लाल, पिवळा आणि हिरव्या रंगातून हवेच्या गुणवत्तेची परिस्थिती दर्शवितील, अशी माहिती महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
महानगरपालिकेने शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी भुवनेश्वरच्या ‘ऑराशूअर’ कंपनीसोबत करार केला आहे. गुगलच्या माध्यमातून शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी ३० यंत्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी भुवनेश्वर येथील ‘ऑराशूअर’ कंपनीसोबत करार केला आहे. ऑराशूअरच्या सीईओ आकांक्षा प्रियदर्शिनी यांनी सांगितले की, शहरातील सध्याची एअर मॉनिटरिंग सिस्टीम जुनी आहे. त्यामुळे ३० सेन्सर-आधारित एअर मॉनिटरिंग उपकरणे बसविण्यात येतील. देखरेखीच्या खर्चासह प्रकल्पाचा भांडवली खर्च गुगलने प्रायोजित केला आहे.
शहरी भागात हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्याचा प्रस्तावित उपाय हा एक व्यापक दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत ३० वायू गुणवत्ता आणि ग्रीन हाऊस गॅस सेन्सर उपकरण शहरात कार्यान्वित केले जाईल. यापैकी २५ संपूर्ण शहरातील वायू प्रदूषणाच्या हॉटस्पॉटस्वर बसविण्यात येतील. तर ५ स्मार्ट सिटी बसेसवर निश्चित करून अशा प्रकारे मोबाईल असतील.
सीसीटीव्हीच्या खांबांवर यंत्र बसणार
स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खांबांवर हे यंत्र बसवले जातील. त्याद्वारे मिळणाऱ्या प्राप्त माहितीचे विश्लेषण स्मार्ट सिटीच्या कमांड अँड क्रोल सेंटरमध्ये होणार आहे. शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठ ठिकाणी सेन्सर बसवणार. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, निवासी क्षेत्रे, बाजारपेठ, वाहतूक जंक्शन आणि मोबाईल वाहतूक यंत्रणा (सार्वजनिक बस) या वेगवेगळ्या ठिकाणी सेन्सर बसवले जातील. सेन्सर्सद्वारे रेकॉर्ड केलेला डेटा नागरी प्रशासनाला तत्परतेने घेण्यास प्रोत्साहित करेल.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी कार्यरत असलेले पर्यावरणतज्ज्ञ सय्यद आसिफ म्हणाले की, हा एक चांगला उपक्रम आहे. कारण एआय-आधारित सेन्सरद्वारे हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान प्रदान करेल.