नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक विमानतळावरून आता विमान देखभाल दुरुस्तीचे (एमआरओ) कामही गतिमान झाल्यामुळे अप्रत्यक्षपणे जगाच्या नकाशावर नाशिकचे नाव अधोरेखीत झाले आहे.विमान दूरुस्तीसाठी जगभरातून विमान कंपन्या नाशिकला विमान पाठवण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय स्थरावर विमान उत्पादक कंपनी एअरबस ने नाशिकला मेन्टेनन्स, रिपेअरींग व ऑपरेशन(एमआरओ) ही विमान दूरुस्ती व देखभाल प्रणाली सूरु करण्यासाठी प्रस्ताव देऊन तसा करार केलेला होता. त्यादृष्टीने मागील आठवड्यात स्कायबसचे एक विमान दूरुस्ती साठी दाखल झाले होते. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दोन मोठे विमान दूरुस्ती व देखभाली साठी एचएएलमध्ये दाखल झाले आहे.
एचएएल विमान निर्मिती कारखान्यांमध्ये विमान दुरुस्तीसाठी स्वत:ची यंत्रणा उभारलेली होतीच. मात्र त्या नागरी विमानसेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्हत्या.एअरबसद्वारे या सुरू कराव्यात यासाठी सातत्याने शासन स्तरावरून देखील प्रयत्न केले गेले होते.अखेर एचएएल च्या पुढाकाराने त्यास मान्यता देत तसा करार केला होता. संरक्षण विभागाचे एमआरओ व प्रवासी विमानांचे एमआरओ प्रणाली वेगळी असल्याने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
संरक्षण विभागाच्या विमानांचे उत्पादन करणारी एचएएल असल्याने इतर विमानाच्या देखभाली साठी विमान कंपन्यांची पहिली पसंती राहण्याची शक्यता आहे. जगभरातील नामवंत विमान उत्पादक कंपनीने एचएएलशी करार केल्यामुळे इतरही विमान कंपन्या यासाठी पूढे येण्याची शक्यता आहे.
त्यानुसार नागरी विमान एअरबस ए-३२० साठी एचएएल नाशिक एमआरओ ऑपरेशन्स गेल्या आठवड्यात खुले केले. या विमान दुरुस्ती कामाला एचएएल नाशिक विमानतळावर प्रारंभही झाला असून एमआरओसाठी आणखी २ विमाने दाखल झाली आहेत.
विमान दुरुस्ती काम गतिमान झाल्यास नाशिक विमानतळावर नाईट लँडिंग व्यवस्था देखिल वेग घेईल. प्रत्यक्षात विमानांची देखभाल दूरुस्तीतून स्थानिक पातळीवर व्यवसायाच्या नवनव्या संधी निर्माण होणार आहेत. सूट्या भागांची मागणी देखिल गतिमान होण्याची शक्यता वाढणार आहे.
परिणामी विमानाचे सूटे भाग बनवण्याची नवी संधी उद्योजकांना उपलब्ध होणार आहे. नाशिक एचएएल हे विमानतळ जगाच्या नकाशावर एमआरओच्या दृष्टीने अधोरेखित राहणार असल्याने नवनवीन सेवा सुविधाउपलब्ध होण्यास मदत होणार आहे.