मुंबई । Mumbai
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना करणे कठीण झाले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण या जाळ्यात अडकलेला असताना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी एक खुलासा केला आहे. देशातील इतक्या उच्च पदस्थ आणि संवेदनशील पदावर असलेल्या व्यक्तीने आपण मोबाईल फोन आणि इंटरनेटचा वापर करत नसल्याचे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अजित डोवाल यांना भारताचे ‘जेम्स बॉन्ड’ किंवा ‘सुपर स्पाय’ म्हणून ओळखले जाते. नुकत्याच दिलेल्या एका माहितीनुसार, ते या डिजिटल साधनांपासून जाणीवपूर्वक दूर राहतात. डोवाल म्हणतात, “तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली माहीत नाही, पण मी खरंच इंटरनेट आणि मोबाईल फोनचा वापर करत नाही. केवळ अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच कुटुंब आणि मित्रमंडळींशी संवाद साधण्यासाठी फोनचा वापर केला जातो, मात्र त्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.”
डोवाल यांचा हा निर्णय केवळ योगायोग नसून, ती एक विचारपूर्वक केलेली कृती आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांच्याकडे दहशतवाद विरोधी मोहिमा, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, सरकारी धोरणे आणि गुप्त मोहिमांची अत्यंत संवेदनशील माहिती असते. आजच्या युगात मोबाईल फोन हॅक होणे किंवा लोकेशन ट्रॅक होणे अत्यंत सोपे झाले आहे. कोणतीही तांत्रिक चूक देशाच्या सुरक्षेसाठी मोठी जोखीम ठरू शकते, हे ओळखून डोवाल यांनी डिजिटल जगापासून लांब राहणे पसंत केले आहे.
अजित डोवाल यांचे संपूर्ण आयुष्य इंटेलिजन्स ब्युरो (IB) सारख्या गुप्तहेर संघटनांशी जोडलेले आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये अनेक वर्षे गुप्तहेर म्हणून राहून भारतासाठी मोलाचे काम केले आहे. शत्रू पक्ष आजकाल सर्वात आधी डिजिटलरित्या पाठलाग करतो, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. आपला मागावा कोणालाही लागू नये आणि आपली हालचाल गुप्त राहावी, यासाठी ते तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकणे टाळतात.
अनेक दशकांपासून गुप्तहेर जगातील एक ‘अजब रसायन’ म्हणून ओळखले जाणारे डोवाल आजही जुन्या पद्धतीच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवतात. देशाच्या सुरक्षेसाठी वैयक्तिक सोयींचा त्याग करणे किती महत्त्वाचे असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अजित डोवाल आहेत. त्यांच्या या सावधगिरीमुळेच भारताची अनेक गुपिते आजही सुरक्षित आहेत, असे मानले जाते.




