मुंबई । Mumbai
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (22 जुलै) एकाच दिवशी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांकडून सत्ताधारी आमदारांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण ईरसालवाडी दुर्घटनेनंतर ही पार्टी रद्द करण्यात आली. दरम्यान दोन्ही नेत्यांचे समर्थक बॅनर्स, पोस्टर्सच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, नागपुरात लावण्यात आलेल्या बॅनरची देखील अशीच चर्चा सुरु आहे. ही दोस्ती तुटायची नाय, असे म्हणत नागपूरात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राजकारणातील दादा अजित दादा आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणत बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरची सर्वत्र चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही फोटो लावण्यात आलेले आहेत. इतकेच नाही तर, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी काढण्यात आलेल्या फोटोचाही यात समावेश आहे. नागपूरमधील अजित पवार गटाकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. नागपुरच्या सेंट्रल एवेन्यूवर हा बॅनर पाहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा विरोधी पक्षनेतेपदासाठी शड्डू; काँग्रेस हायकमांडला पाठविले ३० आमदारांच्या सह्यांचे पत्र
याचदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले आहेत. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पद मिळवलं आहे. अशातच अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. पुन्हा राजकीय समीकरणं बदलून मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे. ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ अशा कॅप्शनसह अमोल मिटकरी यांनी एक अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. “आपल्याला जी गोष्ट पटते लगेच त्यासाठी हो म्हणून टाकतो. परंतु कुणीही उठून सांगितली की माफी मागा. तर माफी मागायला मोकार नाही,” असे अजित पवार यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
“…तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा”; मणिपूर घटनेवरुन केंद्राची खरडपट्टी काढल्यानं भाजप आमदार संतापले