मुंबई । Mumbai
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार आज (२ एप्रिल) बीडच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते राजकीयदृष्ट्या सक्रिय नसल्याचे दिसून आले. अजित पवारांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ते पुन्हा सक्रिय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनीही मुंडे अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित राहतील, असे म्हटले होते. मात्र, मुंडे यांनी स्वतःच आपण या दौऱ्याला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून अनुपस्थितीचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. मात्र, माझी प्रकृती अद्याप ठणठणीत नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबईला जावे लागले. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकत नाही. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला मी पूर्वसूचना दिली आहे.” तसेच, या गैरहजेरीबाबत कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, अशीही त्यांनी विनंती केली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काही आरोपी हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्यावर इतरही काही आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे विरोधक आणि जनतेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर, प्रकृतीच्या कारणाचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या दौऱ्यात सहभागी होणार की नाही, यावर गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात विविध तर्क लावले जात आहेत.
अजित पवारांचा बीड दौरा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. बीड हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा जिल्हा आहे आणि पक्षाच्या भविष्यासाठी येथे मजबूत संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. मुंडे यांच्या गैरहजेरीमुळे पक्षांतर्गत काही अंतर्गत घडामोडी सुरू असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत आणि पक्षातील स्थानाबाबत पुढील काळात अधिक स्पष्टता येईल.