मुंबई । Mumbai
मुंबईमधील कल्याण येथे एका इमारतीमध्ये मराठी माणसांना परप्रांतियाने सराईत गुडांना सांगून मारहाण करायला लावली. अखिलेश शुक्ला असं मारहाण करायला लावणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो मंत्रालयात अधिकारी आहे. हे प्रकरण चांगलं तापलं असून त्याचे पडसाद मंत्रालयामध्ये उमटल्याचं दिसले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी या घटनेची सभागृहात माहिती दिली. मंत्रालयात मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात, तुमचा वास येतो, असं म्हणत शुक्लाने मराठी माणसांना हिणवलं. त्यासोबतच पोलीस स्टेशनला गेल्यावर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अशी खात्री सभागृहात दिली.
अजित पवार म्हणाले, सुनील प्रभूंनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. आत्ता जी माहिती दिली, ती ताबडतोब तपासून तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची हयगय केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान राज्यात ठेवला जाईल, अशाच पद्धतीने प्रशासन वागेल याची खात्री मी सभागृहाला देतो. त्यावर तत्परतेनं कारवाई करण्याचे आदेशही दिले जातील.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारतीतच अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होता होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
या वादातून शुक्ला याने बाहेरून दहा ते पंधरा जणाना बोलावून घेतले. ‘मराठी लोक भिकारडे…’ असं हिणवत शुक्लाने त्याच्या शेजाऱ्यांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिजीत देशमुखच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विजय कळविकटे, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.