मुंबई | Mumbai
जालन्यातील लाठीमाराच्या घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटलेले आहेत. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. याचे पडसाद आज मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पडले. या लाठीमारावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका मांडली.
यावेळी अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांवर टीका करत त्यांना आव्हान दिलं आहे. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा आदेश वरुन आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याला उत्तर देताना अजित पवार यांनी विरोधकांना चॅलेंज दिलं आहे. अजित पवार म्हणाले, दोन दिवस माझी तब्येत ठीक नव्हती. आजारी होतो. पण गैरसमज पसरवला गेला. अंतरवाली सराटी इथं लाठीचार्ज झाला, तो व्हायला नको होता. असे प्रसंग येतात, राज्याचं हित लक्षात घेऊन भूमिका घ्यायला पाहिजे. पण राजकीय पोळी भाजता येते का, याबद्दल प्रयत्न केले गेले. राजकीय कारकिर्दी पाहिले तर अनेकांना संधी मिळाली. मराठा असो मुस्लिम असो, सगळ्यांनी आरक्षणाची मागणी केली. त्यावेळी प्रत्येक सरकारने प्रयत्न केला. उद्याच्याला निर्णय घेत असताना तो कायद्याच्या दृष्टीने योग्य ठरला पाहिजे.
जनतेला आवाहन आहे, बंद पुकारले, संप पुकारला, एसटी बसेस जाळले जात आहे. हे कुठेही झालं तरी राज्य सरकारचंच नुकसान होत आहे. मराठा आंदोलनंही शांततेतं निघाली, सर्वांना त्याचा आदर्श आहे. मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे, सकारात्मक पद्धतीने चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी लगेच निर्णय घेतला, गिरीश महाजन तिथे गेले, त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तिथे जायला सांगितलं आहे. चर्चा करून निर्णय निघू शकतो, मला आवाहन करायचं आहे, काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, खुशालपणे सांगताय वरतून आदेश आला आहे, जर वरतून आदेश आला हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते ऐकू, पण विनाकारण समाजात गैरसमज पसरवला जात आहे. केविलवाणा प्रयत्न आहे, हे महाराष्ट्राला परवडणारं नाही, हा सुसंस्कृती महाराष्ट्र आहे, आंदोलनं थांबवली पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी मराठा समाजाला केलं आहे.