पुणे । प्रतिनिधि
छगन भुजबळ यांना उपोषणाला बसायची वेळ येणार नाही अशी काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले स्मारकासाठी जागा देण्यावरून आमदार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर व्यक्त केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी आज सकाळीच फुलेवाड्याला भेट देऊन महात्मा फुलेंना अभिवादन केलं. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गुरुवारी छगन भुजबळ यांनी “इथे अनेक लोक आहेत जे स्वत: महात्मा फुलेंच्या स्मारकासाठी जागा द्यायला तयार आहेत. पण अधिकारी त्यांना सांगतात की किती पैसे द्यायचे ते आम्हाला माहिती नाही, प्रक्रिया पूर्ण झाली नाही वगैरे. फक्त टोलवाटोलवी चालू आहे. मी काही उपोषण वगैरे करत बसत नाही. पण आता असं वाटतं की ठीक आहे, शेवटचा उपाय म्हणून बसू उपोषण करायला. मी सरकारमधल्या एका पक्षाचा एक आमदार आहे. त्यामुळे आता इथे उपोषण करायला मी मोकळा आहे अशा शब्दांत इशारा दिला होता.
त्यावर अजित पवार म्हणाले, रेल्वे, शहरीकरणासाठी जागा अधिग्रहित करतो. त्याचे साधारण नियम ठरले आहेत. मी यासंदर्भात भुजबळांशीही बोलेन. अधिकाऱ्यांशीही बोलेन. आपल्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत की किती पैसे द्यायचे वगैरे. त्यात काही अडचणी असतील तर आम्ही मंत्रिमंडळासमोर हा विषय मांडून मार्ग काढू. छगन भुजबळांना उपोषणाला बसायची वेळ येणार नाही अशी काळजी घेऊ”.
महात्मा फुलेंवरील चित्रपटाबाबत काय म्हणाले अजित पवार?
महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर हिंदू महासभेनं आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहातं. चित्रपटाचा समाजावर विपरीत परिणाम होणार आहे का याची शहानिशा केली जाते. आत्तापर्यंत अनेक चित्रपट आले. तेव्हाही अशी चर्चा झाली. पद्मावतीचं पद्मावत केलं आणि मग तो चित्रपट प्रदर्शित झाला. पण तरी काहीजणांचा त्याला विरोध होता. घटनेनं सगळ्यांना मतस्वातंत्र्य दिलं आहे. त्यानुसार लोक बोलत असतात. पण सरकार म्हणून आम्ही काळजी घ्यायला हवी की त्यातून समाजात कोणतीही तेढ निर्माण होणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.
तिसरा अहवाल आल्यानंतर मंगेशकर रुग्णालयावर कारवाई
तनिषा भिसे हिच्या मृत्यूबाबत आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरले आहे. धर्मादाय आयुक्तांचा देखील अहवाल आला आहे. त्यामुळे मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी होणार? याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या माहिती प्रमाणे या प्रकरणी दोन अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आले आहेत. तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई करेल. मुख्यमंत्री आज (शुक्रवारी) पुण्यात मुक्कामी येणार आहेत. उद्या (शनिवारी) शिवाजी महाराजांची पुण्यतिधी आहे. रायगडावर अमितभाई शहा येणार आहेत. आम्ही रायगडला जाणार आहोत. तेथे मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर याबाबत मी त्यांना विचारेन. प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामध्ये कुणीही असा हलगर्जीपणा करता कामा नये. वैद्यकीय क्षेत्रात दोन पैसे कमवण्यापेक्षा सेवाभावी वृत्ती लक्ष्यात घेऊन काम केले पाहिजे. पैशाअभावी कुणाचे उपचार नाकारू नयेत. असे कोण करत असेल तर खपवून घेणार नाही. असा इशारा देखील अजित पवारांनी दिला.
आर्थिक संकटावर मार्ग काढू…
एसटी आर्थिक संकटात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थखात्याकडून परिपूर्ति निधी मिळत नसल्याचे सांगत आर्थिक संकटाचे खापर अर्थखात्यावर फोडले होते. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, एसटीमध्ये सवलती देत असताना बजेटमध्ये तरतदू करत असतो. देशात, जगात सार्वजनिक वाहतूक सेवा कधीच फायद्यात नसते, अशी माझी माहिती आहे. बीओटी तत्वावर जागा देऊन इन्कम वाढवण्याचा प्रयत्न आहे. परिवहन विभागाच्या सरकाऱ्यांशी बोलने तसेच मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन यातून मार्ग काढला जाईल. असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र शिवसेनेच्या आक्षेपानंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, अजून याबाबतचा तिढा सुटला नाही. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.