नाशिक | मोहन कानकाटे | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (Nationalist Congress Party) ४० हून अधिक आमदारांना (MLA) आपल्याबरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाशी (ShivSena Shinde group) हातमिळवणी केली. उपमुख्यमंत्रीपद मिळवून आणि सोबतच्या ९ सहकाऱ्यांना मंत्रिपदे देऊन महाराष्ट्राच्या सत्तेत वाटेकरी झाले. गेल्या साडेतीन महिन्यांपासून अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. ते महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून आता अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांच्या समर्थकांसह विविध पक्षांतील नेत्यांकडून केला जात आहे…
विरोधी पक्षांतील नेते अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असे भाकीत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा अजितदादांना मुख्यमंत्री करण्याबाबत जाहीरपणे बोलून दाखविल्याने अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या अपेक्षा उंचावणे साहजिकच आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, वेळ येईल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू’,असे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आता अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना अधिक ऊत आला आहे. परंतु, अजित पवार नेमके मुख्यमंत्री भाजपच्या (BJP) पाठिंब्याने बनणार की स्वत:च्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांच्या पाठिंब्यावर? याबाबतही चर्चांना जोर चढला आहे.
Pankaja Munde : पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार? समर्थकांसह राज्याचे लक्ष
अजित पवारांना मुख्यमंत्री बनायचे असेल तर त्यांना १४५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असायला हवा. अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ चा जादुई आकडा गाठावा लागेल, असे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार १४५ चा आकडा गाठणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवारांना भाजपच्या पाठिंब्यावरसुद्धा मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. कारण भाजपचा आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यमान आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न असून तशी चाचपणी देखील सुरु झाल्याचे बोलले जात आहे.
त्यात राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांचा समावेश असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.फडणवीसांना भाजपकडून नागपुरातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या येथून खासदार म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आहेत. गडकरींनी बऱ्याचदा आपल्या विविध भाषणांतून उघडपणे आपल्याच सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या परखड बोलण्यामुळे अनेकदा भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने नितीन गडकरींवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. पक्षाकडे स्वतःहून तिकीट मागणार नसल्याचे देखील गडकरींनी सांगितले आहे.
“जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत…”; माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकरांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून अजित पवारांवर गंभीर आरोप
गडकरींनी केलेली वक्तव्ये पाहता यंदा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा विचार त्यांचा असू शकतो. तसेच पक्ष नेतृत्त्व त्यांना वयाचे कारण देत उमेदवारी नाकारू शकतो असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गडकरींचा पत्ता कट झाला तर त्यांच्याजागी मुळचे नागपूरचे असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडणूक लढविण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. फडणवीस जर लोकसभेवर (Loksabha) गेले तर भाजपकडून महाराष्ट्रात (Maharashtra) आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मराठा समाजाचा चेहरा म्हणून मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार बनवून पुढे आणले जाऊ शकते.
अजित पवारांची प्रशासनावर असणारी मजबूत पकड आणि सरकार चालविण्याचा असणारा अनुभव आदी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्याचा फायदा भाजपचे नेतृत्व करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय भाजपत सध्या राज्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशिवाय दुसरा कुठलाही मोठा मराठा समाजाचा चेहरा नाही. एकनाथ शिंदेंना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली तशी संधी अजित पवारांना सुद्धा दिली जाऊ शकते. यामुळे आता अजित पवार ‘मुख्यमंत्री’ बनण्याची इच्छा भाजपच्या पाठिंब्याने पूर्ण करतात की स्वत:च्या पक्षातील आमदारांच्या पाठिंब्यावर? मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Accident News : समृध्दी महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे आली समोर