मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याची चर्चा विधानसभा निवडणुकीनंतर जोर धरत आहे. निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अपात्र महिलांकडून या योजनेतून मिळालेले पैसे वसूल केले जातील, अशी चर्चा होत होती. काही महिला स्वत:हून पैसे करत आहेत, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे, लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, सरकारकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट शब्दात शासनाची भूमिका मांडली. लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या, मात्र तरीही लाभ घेतलेल्या महिलांकडून रिकव्हरी करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न पुण्यात पत्रकारांकडून अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. “रिकव्हरी करण्याचा आमचा अजिबात विचार नाही,” असा खुलासा पवार यांनी केला आहे.
“लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा आमच्याकडे मर्यादित वेळ होता. त्यामुळे आम्हाला बहिणींचे आधार कार्ड लिंक करता आले नाहीत. पण आता आम्ही खरोखर ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत”, असे अजित पवार म्हणाले. “पण या योजनेतील महिलांकडून रिकव्हरी करण्याचा अजिबात विचार नाही”, असेही अजित पवारांनी म्हटले. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना देण्यात आलेले पैसे परत घेतले जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत काही बांगलादेशी महिलांनीही लाडकी बहीण योजनेतून लाभ घेतल्याचे नुकतेच उघडकीस आले. त्यावरही अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “बांगलादेशी लोक भारतातील मुंबई, पुणे, कोलकाता अशा शहरांमध्ये घुसल्याचे समोर येत आहे. या लोकांना शोधून परत पाठवण्याचे काम सरकारकडून सुरू करण्यात आले आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा