Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याबोरवणकरांच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचा खुलासा; म्हणाले....

बोरवणकरांच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचा खुलासा; म्हणाले….

मुंबई | Mumbai

पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातून अजितदादांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून सरकारी जमीन खासगी व्यक्तीला देण्याचा डाव तत्कालीन पालकमंत्र्यांचा होता असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. सरकारी जमिनीचा लिलाव करून ती खासगी व्यक्तीला देण्यासाठी पालकमंत्री दादा यांचा आग्रह होता असे बोरवणकरांनी लिहिले आहे. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान अजित पवार यांनी मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार म्हणाले, “मी कधीही अशा जमिनीच्या लिलावात सहभागी झालो नाही. खरे तर अशा लिलावांना माझा विरोध आहे. इतकंच नाही तर जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना नाहीत. आम्ही अशा जमिनी विकू शकत नाही. असे मुद्दे महसूल विभागासमोर जातात, जे राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवतात. मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. रेडी रेकनर दरानुसार जमिनीची किंमत ठरवतात. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हे मला सांगायचे आहे… अशा प्रकरणांमध्ये मी नेहमीच सरकारची बाजू कशी घेतो हे तुम्ही अधिकाऱ्यांकडून तपासून घेऊ शकता. माझ्यावर दबाव असला तरीही मला पर्वा नसते, असा खुलासा त्यांनी केला आहे.

मीरा बोरवणकर यांनी काय म्हंटले?

मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकांत लिहिण्यात आले आहे की, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. तसेच आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा आढावा घेतला. एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्या बद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा, येरवाडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय असल्याचं त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्याची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी, मी पालक मंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही, असे स्पष्टपणे या पुस्तकांत लिहिण्यात आले आहे. तसेच, कार्यालयं आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचं मी त्यांना सांगितलं. मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. मात्र मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकारला, असा गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांच्याकडून करण्यात आला आहे. बोरवणकर यांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.

मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये अजित पवार यांचे थेट नाव नसले तरी 2010 मध्ये तेच पुण्याचे पालकमंत्री होते. ज्यामुळे पुण्याच्या पालकमंत्र्यांचे थेट नाव आरोपांमध्ये घेण्यात आले नसले तरी मीरा बोरवणकर यांनी सांगितलेले पालकमंत्री हे अजित पवारचं आहेत, हे मात्र जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता माजी आयपीएस अधिकाऱ्यांनीच थेट आरोप केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु, आता या आकोपांनंतर अजित पवारांची चौकशी करण्यात येणार की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या