नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८४ वा वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आतापर्यंतची मोठी घडामोड आज घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे इतर नेत्यांसह शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आज दिल्लीतील ६ जनपथ येथे शरद पवार यांची अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेतली. अजित पवारांसह इतर नेत्यांनीदेखील पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार पत्नी तसेच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्यासहीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही अजित पवारांबरोबर होते. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारही यावेळेस त्यांच्यासोबत होते.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. त्यांचे दर्शन घेतले, चहा-पाणी झाले. सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या. परभणीला काल असे का घडले? राज्यात इतर ठिकाणी काय सुरू आहे? अशा पद्धतीच्या आमच्या चर्चा झाल्या. आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमचे अधिवेशन कधी आहे? अशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितल. मी कुटुंबातील सदस्य आहे, मी बाहेरचा कोणीच नाही, असेही अजित पवारांनी सांगितले. आजची भेट ही कौटुंबिक असल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला.
राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत काय म्हणाले?
शरद पवारांच्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आम्ही तिघांनीच आतापर्यंत शपथ घेतली आहे. बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १६ तारखेपासून अधिवेशन आहे. त्यावेळेस मंत्री असणे गरजेचे असते याबाबत आमची चर्चा झाली. बहुतेक १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. राजकारणात टीका-टिप्पणी होत असते. पण, राजकारणाव्यतिरिक्त काही संबंध असतात. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रात कसे राजकारण करायचे ते शिकवले आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.
मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या एक्स अकाऊंटवरुन मोदींनी पवारांना शुभेच्छा दिल्यात. “राज्यसभेचे खासदार आणि वरिष्ठ नेते श्री शरद पवारजी यांना वाढदिसवाच्या शुभेच्छा. त्यांच्या दिर्घ आणि सुदृढ आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो,” असे म्हटले आहे.