बारामती | Baramati
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांचं काल (बुधवारी) बारामती येथे एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांसह एकूण पाच जणांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. आज बारामतीमधील (Baramati) विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांनी अंत्यसंस्काराआधी धार्मिक विधी आणि पूजा केली. यानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दोन्ही मुलांनी अजित पवारांना मुखाग्नी दिला.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या वडील शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबाला धीर देत सावरताना दिसल्या. काल (बुधवारी) अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच दिल्लीत असलेल्या सुप्रिया सुळे या आपल्या वहिनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि भाचा पार्थ पवारसह तात्काळ बारामतीकडे रवाना झाल्या. अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे कालपासून ते आज अंत्यविधीवेळीपर्यंत सतत, सावलीसारख्या आपल्या वहिनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत दिसत होत्या.
काल (बुधवारी) रात्री सुप्रिया सुळे या विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटलेल्या जनसागराला शांत आणि सांभाळताना दिसल्या. यानंतर आज (गुरुवारी) अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था करतांना आणि अंत्यविधीच्या तयारीचा आढावा घेताना दिसल्या. तसेच आज सुप्रिया सुळे यांनी वहिनी सुनेत्रा पवारांना हाताला धरून अजित पवारांच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी घेऊन आल्या. त्यावेळी दोघीनाही अश्रू अनावर झाले.
दरम्यान, आपला लाडका ‘दादा’ सोडून गेल्यामुळे सुप्रिया सुळे मनातून खचल्या असल्या तरी देखील त्या संपूर्ण कुटुंबाला आज आधार देताना दिसल्या. अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ‘अजित दादा परत या, अजित दादा अमर रहे, एकच वादा अजित दादा, अजित पवार अमर रहेंगे’च्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि आक्रोशाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यांना पार्थ पवार आणि जय पवार (Jay and Parth Pawar) यांनी हात जोडून शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र भावनिक झालेला जमाव स्वत:ला रोखू शकत नव्हता. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय जड अंत:करणाने अजित पवारांना अखेरचा निरोप देताना दिसले.




