Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार; प्रफुल्ल पटेलांचा दावा, तारीखही सांगितली

अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार; प्रफुल्ल पटेलांचा दावा, तारीखही सांगितली

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. या घटनेनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव आम्हालाच मिळणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी तारखही सांगितली आहे.

- Advertisement -

शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर अजित पवार गटाकडून उत्तरसभेचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अजित पवार गटाचे अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. काही नेत्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादीमधील बंडखोरीवर भाष्य केलं तर, काहींनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. दम्यान राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील पक्ष आणि चिन्हाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, बंडखोरीनंतर लोकांच्या मनात शंका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. पण मी सर्वांना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून ३० सप्टेंबरपर्यंत निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजित पवार गटाच्या बाजूने लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडेच राहणार आहे.

राजकारणात सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्याबद्दल अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेकजण आपापल्या भूमिका मांडत असले तरी आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून अजित पवारांसह आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे. काही लोक म्हणतात पक्षात फूट नाही आणि हेच खरं आहे. त्यामुळे या निर्णयाचे समर्थन आपण सर्वांनी करावे. कारण राजकारणात असे अनेक प्रसंग येत असतात, अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे आयुष्यात कधीतरी महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. आम्ही सर्वांनी देखील मिळून हा सामूहिक निर्णय घेतला आहे. हा लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेला निर्णय आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादी पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून सुरु असून, आता कायदेशीर लढाई देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात अजित पवार गटाकडून कार्यकर्त्याचे शपथपत्र भरुन घेण्यात येत आहेत. तसेच निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल केले जाणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या