छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (१८ मे) बारामतीत मतदान शांततेत पार पडलं. सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे लवकर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान केंद्रावर त्यांची अचानक भेट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी झाली. या भेटीत दोघांमध्ये थोडकाच पण लक्षवेधी संवाद घडला.
अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना पाहताच मिश्किल हसत, “लक्ष राहू द्या आमच्यावर,” असं म्हटलं. त्यावर तितक्याच मिश्किलपणे हर्षवर्धन पाटलांनी “चांगलं ठेवलंय की!” असं उत्तर दिलं. या संवादावर आजूबाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हास्यकल्लोळ उसळला.
यानंतर अजितदादांनी “चिठ्ठी बरोबर काढल्या का?” असा प्रश्न करत टोमणा मारला. त्यावर हर्षवर्धन पाटलांनी “केल्यावर” असं सांगत उत्तर दिलं. दादांनी त्यावर “आम्ही पाच संस्थेवर आहोत, आम्हाला माहितीच नाही!” असं म्हणत पुन्हा एकदा खुसखुशीत टोला लगावला. हर्षवर्धन पाटील यांनीही “चिठ्ठीत चुकलं नाय ना, काय बघा!” असं म्हणत अजित पवारांचे हलक्याफुलक्या शब्दांत पाय खेचले.
या दोन्ही नेत्यांमधील हा संवाद सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजकीय परिपक्वता आणि परस्पर सन्मान जपत झालेल्या या संवादाची चर्चा सर्वत्र होत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, “ज्यांच्यात कारखाना चालवायची धमक आहे, त्यांनाच मतदान करावं. ही निवडणूक एकतर्फी नाही. कुठलीही निवडणूक आम्ही तुल्यबळ समजतो आणि त्यात गांभीर्याने भाग घेतो.”
दरम्यान, अजित पवार यांनीही साखर कारखान्याचे स्थानिक अर्थकारणात महत्त्व अधोरेखित केलं. “हा कारखाना आमच्या ५३ गावांसाठी महत्त्वाचा आहे. मी स्वतः सभासद आहे. माझे वडील, आजोबा हेही सभासद होते. आमच्या कुटुंबातील अनेकजण सभासद आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक याच वर्षी मार्चमध्ये होणार होती. मात्र अंतिम मतदार यादीविषयी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. सहकार विभागाने याबाबत ९ मार्च रोजी आदेश जारी केला होता.