मुंबई । Mumbai
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत असून अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरुन टीका होत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
तसेच, लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिलीय.लाडकी बहिण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत, त्यांच्याबद्दलही अजित पवारांनी मोठी अपडेट दिलीय. तसेच योजना बंद होणार का? यावरही स्पष्टीकरण दिलंय. लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले अजित पवार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो. 1500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल सरकारने उचलल्याचे अजित पवार म्हणाले. लाडकी बहिण योजनेच अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक 10 ते 25 हजारापर्यंतची कर्ज देणार असल्याबद्दल दरेकरांनी माहिती दिल्याचेही अजित पवार म्हणाले.
ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचाय त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू. कारण, हा थोडाथडका पैसा नाही. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात येतील असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. या माध्यमातून लाडकी बहीण सक्षम होईल. तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल, असेही ते म्हणाले.
महसुली तुटीबाबत सभागृहात आणि माध्यमातूनही चर्चा झाली, चिंता व्यक्त केली गेली.राज्याचं कर उत्पन्न कमी झालं म्हणून महसुली तूट दिसतेय का ? तर असं अजिबात झालेलं नाही. कारण आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने महसुली उत्पन्न वाढलेले दिसेल. जीएसटी आल्यापासून करदाते वाढलेत. येणाऱ्या वर्ष-दोन वर्षांच्या काळात आणखी करदाते वाढतील आणि त्यामधून कर उत्पन्नात भर पडेल, असेही ते म्हणाले. 2024-25 या वर्षात 3 लक्ष 28 हजार कोटी एवढा जीएसटी (SGST+CGST+IGST) जमा केला गेला. मागील वर्षाच्या तुलनेत 12.3 टक्के एवढी वाढ आहे. महाराष्ट्रात जमा होणारा देशपातळीवरील जीएसटीचा वाटाही वाढतो आहे. यंदा तो 16.31 टक्के आहे. हे फार महत्वाचं आहे की, 2024-25 मध्ये 95.20% महसुल जमा झाला. 2025-26 मध्ये सुद्धा 100% महसूल जमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.