श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
राज्यातील सरकार हे रेडे कापणे, ज्योतिषी, गंडा, दोरी करून अंधश्रद्धा वाढवित आहे यांना जबाबदारीचे भान नाही. यांना सत्तेची धुंदी चढली आहे. सत्तेतील मंत्री प्रवक्ते रोजच बेताल वक्तव्य करीत आहेत. तर राज्यपालही राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहेत.कायदा सुव्यवस्थेची ऐसे तैसे करणार्या या गद्दार सरकारचे आत्ता काही खपवून घेतले जाणार नाही असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दिला.
पिंपळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने संवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात शेतकर्यांच्या खरिपासह आता रब्बी हंगामही अडचणीत आला आहे. त्यातच भर म्हणुन खाते, औषधे, बी-बीयाने डिझेल, पेट्रोल, गॅस, जीवनावश्यक वस्तू महागाईने शेतकरी व सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तोंडी सांगतात विज बिल भरू नका. मात्र लेखी आदेश काढत नाहीत. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी शेतकर्यांचे कनेक्शन कट करत आहेत. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशी सध्या परिस्थिती आहे. हे सरकार पूर्वीची कामे बंद करून नवीन निर्णय घेत आहे. सरकार विरोधात बोलेल त्याला ईडी – बीडीची भीती दाखवून कारण नसतानाही जेलमध्ये टाकले जात आहे. या विरोधात येत्या 17 डिसेंबरला महा विकास आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढणारा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप होतेे. यावेळी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी प्रस्तावित केले तर या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती राहुल जगताप, कुकडीचे उपाध्यक्ष विवेक पवार, श्रीगोंदा कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, मेजर बापूराव निंभोरे, विश्वास थोरात, संभाजी देवीकर, ऋषिकेश गायकवाड, अमोल देशमुख, कल्याणी लोखंडे, सरपंच मीना सकट आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अगामी निवडणुका महाविकास आघाडी मार्फतच
जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, विधानसभा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र बसुनच निर्णय घ्याचा आहे. मागील विधानसभेला घनश्याम शेलार हे अवघ्या 2400 मतांनी पराभूत झाले. स्वबळाची भाषा करू नका. अवकात असेल तर लढा पण हारल्यानंतर गाठ अजितदादाशी आहे.