मुंबई । Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. १२ डिसेंबर) शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते.
अर्थात या भेटी वाढदिवसानिमित्त असल्या तरी शरद पवार गटाचे काही खासदार अजित पवार यांच्यासह सत्तेत बसण्यास इच्छुक असल्याची चर्चा असल्याचे वृत्त समोर येत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला घेरले आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षातील खासदार फोडण्यासाठी अजित पवार यांच्यापुढे काय प्रलोभन ठेवले त्यासंदर्भातील गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या गटातील खासदार अजित पवार यांच्या गटात जाऊ शकतात का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, माझी माहितीनुसार अजित पवार यांना एक ऑफर दिली आहे. त्यांना सांगितले गेले आहे की तुम्ही पवार साहेबांचे (शरद पवार) यांचे पाच खासदार फोडून घेऊ या. मग तुमचे सहा खासदार होतील. त्यानंतर तुम्हाला तुम्हाला मंत्रिपद देऊ. कारण केंद्रात सहकारी पक्षाला मंत्रिपदासाठी सहा खासदार हवे आहे, असे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपकडून सांगितले आहे, अशी मला माहिती मिळाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
राऊत पुढे म्हणाले, वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार यांनी प्रचंड मेहनत करुन दहा खासदार निवडून आणले आहे. आता ते खासदार फोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे फुटणाऱ्यास लाज वाटली पाहिजे. मी पक्ष सोडून जाण्याचे पाप मी केले असते, तर माझ्यात बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या नजरेस नजर भिडवण्याची हिंमत झाली नसती. मला वाटले असते मी पाप केले आहे, माझे मन मला खाल्ले असते. परंतु या लोकांनी लाज सोडली आहे.
शरद पवार गटाचे खासदार नॉट रिचेबल आहे का? यावर राऊत म्हणाले, शरद पवार गटातील सर्व खासदारांना मी पवार साहेबांच्या बंगल्यावर पाहिले. काही लोकांनी लाज शिल्लक ठेवली आहे. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नाही, तर ते महाराष्ट्राशी बेईमानी करत आहे. हे फार काही दिवस टिकणार नाही. प्रत्येक गोष्टीला अंत असतो. जगात हुकुमशाहीचा अंत लोकांच्या हातून झालेला आहे.