मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या लातूर (Latur) येथील पत्रकार परिषदेनंतर काल (रविवारी) छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर पत्ते फेकले होते. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी घाटगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती.
या मारहाण प्रकरणानंतर राष्ट्रवादीवर (NCP) राज्यभर टीकेची झोड उठल्यानंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) राष्ट्रवादीच्या राज्यभरातील कार्यालयांबाहेर निदर्शने करत या मारहाणीचा निषेध नोंदवला आहे. त्यानंतर आता हे मारहाण प्रकरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना चांगलेच भोवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरज चव्हाण यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
लातूरमधील घटनेवर अजित पवारांनी केली नाराजी व्यक्त
लातूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या. अशा शब्दात अजित पवार यांनी मारहाणीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.




