अकोला | Akola
राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा केले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, मध्यंतरी आपण या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे या संदर्भात प्रयत्न केले होते. मात्र त्याला दोन्हीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते प्रयत्न थांबवले होते. आता आपण शेवटच्या श्वासापर्यंत हे दोन्ही नेते एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सोडणार नाही, असे मिटकरी म्हणाले. दुसरीकडे, १३ ऑक्टोबर रोजी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्वागतासाठी आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकरांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागल्याने चर्चा रंगली आहे.
मिटकरी पुढे असे ही म्हणाले की, अजितदादा आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावे, राष्ट्रवादीसोबत बाळासाहेब आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हांला राहील, असेही ते म्हणालेत. त्यामुळे अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल त्यांनी आमच्या सोबत यावे. त्यांच्या काही अटीशर्ती असेल तर आपण मध्यस्थी म्हणून काम करू. आगामी निवडणुकीत शिवशाहू-फुले-आंबेडकरांच्या वारसदारांनी एकत्र यावे, अशी भावनाही अमोल मिटकरींनी बोलताना व्यक्त केली आहे. एकीकडे महायुतीमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतानाच अमोल मिटकरी यांनी केलेल्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अजित पवार महायुतीमध्ये नाराज नाहीत, जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये खटका उडवल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खोट्या बातम्या पसरवण्याचे उगमस्थान तुतारी गट तसेच मविआतून आहे. जाणीवपूर्वक अजित पवार आणि महायुती सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही अमोल मिटकरींनी यावेळी केली.
ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघातील जनतेचा आपल्यावर उमेदवारीसाठी दबाव आणि आग्रह आहे. सध्याच्या भाजप आमदारांबद्दल लोकमानसामध्ये नाराजीची भावना असल्याची जनतेची माहिती आहे. अकोट ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे मला अकोट मतदारसंघातून लढायचं आहे. याबद्दल पक्षाध्यक्ष अजित दादांकडे म्हणनं मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा