नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल २३० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपने १३२ जागांवर, शिवसेना शिंदे गटाने ५७ जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावे लागले. एकीकडे एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनीही भाजपा मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे जाहीर केले असताना अद्याप भाजपाकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याचदरम्यान अजित पवारांनी सत्तेचे स्वरूप कसे असेल, याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली.
आपण दिल्ली दौऱ्यावर असून एका बैठकीसाठी आपण दिल्लीला आलो असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. अजित पवारांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत भूमिका मांडली. आज रात्री बहुतेक ९ वाजता एकनाथ शिंदे, मी, देवेंद्र फडणवीस आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख सहकारी अशी आमची बैठक होईल. त्या बैठकीत पुढील गोष्टींबाबत निर्णय होईल, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
शिवसेनेचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल जाहीर केलेले आहे की, पीएम मोदी आणि ज्येष्ठ नेते अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आमचीही तीच भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले.
आम्ही एकत्र चर्चा करून पुढे काय करायचे यावर निर्णय घेऊ. मंत्रिमंडळ कसे असेल, त्यात मुख्यमंत्री व इतर दोन उपमुख्यमंत्री याबाबत साधक-बाधक चर्चा होईल. त्यातून सत्तास्थापनेबाबत बरेच अंतिम स्वरूप येईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्लीतील निवडणुक लढवणार
आम्हाला तीन राज्यांत मान्यता मिळाली आहे. आता आम्हाला हे इथेच थांबवायचे नाहीय पुढे न्यायचे आहे. राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून सक्षम आणि यशस्वी बनविण्यासाठी पहिला टप्पा दिल्ली निवडणूक असणार आहे. विरेंद्रसिंग यांच्या नेतृत्वात आम्ही पक्ष वाढवू, दिल्लीत आम्ही जरूर खाते उघडणार आणि यशस्वी होणार असा मला कार्यकर्त्यांचा विश्वास पाहून वाटत असल्याचे पटेल म्हणाले. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आम्ही जो गमावलेला तो लवकरात लवकर मिळवून दाखवू असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पुढे ते म्हणाले, राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. दिल्लीत आपला नक्की विजय होईल, राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा आपण पुन्हा राष्ट्रवादीला मिळून देऊ असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्ली विधानसभेची निवडणूक लाढण्याची शक्यता आहे.
“आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता. त्यासाठी आता अधिक काम करण्याची गरज आहे, आम्ही लढू आणि आम्ही यशस्वी होऊ.” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. डिसेंबरनंतर आपण दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेऊ. पुढे कसे जायचे त्यावर त्यात मंथन करू. यंग जनरेशनला आपणे पुढे आणणार आहोत. महाराष्ट्रात महिला मतदारांनी आपल्याला चांगली साथ दिली. लोकांनी मोठा विश्वास दाखवला आहे. त्याला पूर्ण करायचे आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.