मुंबई | Mumbai
देशातील लोकसभेच्या (Loksabha Election) ५४३ जागांचा निकाल मंगळवार (दि.०४) जून रोजी जाहीर झाला. या निकालात (Result) महाराष्ट्रात (Maharashtra) महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यातून ४५ प्लसचा नारा देणाऱ्या भाजपची चांगलीच हवा निघाली आहे. तर महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ रायगड मतदारसंघातून विजय मिळाला आहे. पंरतु, लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठेची केलेली बारामतीची जागा त्यांना जिंकता आलेली नाही.
यानंतर आता अजित पवारांना (Ajit Pawar) बारामतीचा पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत असून त्यांनी या निकालाचा राग निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणारे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यावर काढल्याची चर्चा होत आहे. अजित पवारांनी बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलवली होती. त्यानंतर त्यांनी बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवारांना दूर करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण कुस्तीगीर परिषदेने दिले. त्यानंतर अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आता या निर्णयाबाबत युगेंद्र पवार आणि शरद पवार गट काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या या निर्णयानंतर माध्यमांशी बोलतांना युगेंद्र पवार म्हणाले की, “या निर्णयाबाबत मला माहिती नाही. तसेच मला कुणी अध्यक्षपदावरुन हटवले आहे हे अधिकृतरित्या सांगितलेले नाही. कुस्तीगीर परिषदेची (Wrestlers Council) बैठक झाली त्यात काहीतरी निर्णय झाला अशी माहिती माझ्याकडे आहे, ” असे त्यांनी म्हटले.
युगेंद्र पवार नेमके कोण आहेत?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजीव आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचेही फोटो झळकले होते. तसेच राष्ट्रवादीतील फुटीनंतर श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.