Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या'त्या' भुखंडाशी माझा काहीही संबंध नाही; अजित पवारांनी मीरा बोरवणकरांचे आरोप फेटाळले

‘त्या’ भुखंडाशी माझा काहीही संबंध नाही; अजित पवारांनी मीरा बोरवणकरांचे आरोप फेटाळले

मुंबई | Mumbai

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर आपल्या पुस्तकातून गंभीर आरोप केले आहेत. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी तीन एकर जमीन एका खासगी विकासकाला देण्याचा घाट घातला होता, असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे.

- Advertisement -

मात्र अजित पवारांनी दावा फेटाळत जमिनीबाबत आपल्याला असा कोणताही अधिकारच नसल्याचे स्पष्ट केले. येरवडा येथील ३ एकरची जागा खासगी विकासकाला देण्याच्या प्रस्तावाशी माझा काहीही संबंध नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. एखादा व्यक्ती पुस्तक लिहित असताना प्रसिद्धीसाठी काही खळबळजनक गोष्टी लिहिल्या की ते पुस्तक प्रकाश झोतात येते, तसा प्रयत्न यावेळी दिसून येतो, असा टोमणाही अजित पवार यांनी बोरवणकर यांना मारला.

अजित पवार म्हणाले, मी आजपर्यंत म्हणजे जवळपास 32 वर्षे झाली, माझा स्वभाव जरी कडक असला तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलत असतो. माझ्याकडे आतापर्यंत अनेक विभागांचा कारभार होता, त्या अधिकाऱ्यांशी मी योग्य पद्धतीने वागलो असल्याचं अजित पवार म्हणाले. मी कुणाच्या टीकेला उत्तर देत नाही. मागील 3 ते 4 दिवस माझ्या विरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिलं नाही. माझा त्याचाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्ष पालकमंत्री होतो. मी एवढ्या वर्षात कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत. जर एखाद्याचं काम होत नसेल तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो. पण चुकीचं काही काम करत नाही.

एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना शहरातील अनेक प्रश्न असतात. संबंधित लोक जेव्हा तुम्हाला पालकमंत्री म्हणून एखादी गोष्ट सांगत असतात, त्यावेळी आढावा घ्यावा लागतो. तत्कालिन सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, गृह खात्याच्या निर्णयानंतर मी येरवाड्यामधील भूखंडाविषयी मीरा बोरवणकर यांना विचारलं. त्यावेळी त्यांनी भूखंड खासगी विकासकाला देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर मी कधीही त्या प्रकरणावरून त्यांना हटकले नाही, अशी स्पष्टोक्ती अजित पवार यांनी दिली. त्याचवेळी असे निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रिमंडळाला असतात. पालकमंत्री असे निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगायला देखील अजित पवार विसरले नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या