मुंबई । Mumbai
काही दिवसांपासून मुघल शासक औरंगजेबाची कबर आणि नागपूर येथे उसळलेली दंगल यामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. राज्यात दोन गटात तणावाची पार्श्वभूमी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लीम समुदायाशी संवाद साधला. मुस्लीम समुदायाला धमकविण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
अजित पवार म्हणाले की, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळा दाखवेल तो दोन गटात संघर्ष करून कायदा व सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल. तो कोणीही असला तरी त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही किंवा माफ केले जाणार नाही. तसेच, पवार म्हणाले की, रमजान हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. त्यातून एकता आणि बंधुत्वाचा संदेश मिळतो. भारत हे विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांनी जातींना एकत्र आणून समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. हा वारसा आपण पुढे नेला पाहिजे.
अजित पवार यांनीच आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवरुन मरिन लाईन्स इथं आयोजित करण्यात आलेल्या या इफ्तार पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. “रमजाननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो,” असं अजित पवारांनी हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे. या इफ्तार पार्टीसाठी अजित पवारांबरोबरच प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरेही उपस्थित होते.