नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar
अक्कलकुवा (Akkalkuva) येथील ग्रामपंचायतीतील (Gram Panchayat) ३ कोटी ३४ लाख ७९ हजार ४९३ रुपयांच्या अनियमीततेप्रकरणी अखेर गटविकास अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ११ जणांविरुद्ध काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा दिवसांपुर्वीच सदर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू त्यात टाळाटाळ होत होती. अखेर ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेवून ही कारवाई करण्यात आली आहे.
अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीत निधीच्या अनियमिततेबाबत गेल्या चार वर्षापासून चौकशी सुरु होती. संबंधित प्रशासक, विस्तार अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना लेखी देऊनही अहवाल सादर करण्यात आलेले नाही. याउलट गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे दप्तरच गहाळ झाले होते. यामुळे एक वर्ष ८ महिन्यांचा कालावधी उलटूनही कोणताही अहवाल प्राप्त होवू शकला नाही. यामुळे त्या-त्या कालावधीतील लेखा परीक्षण करण्यात येवून संबंधित दोषींवर जबाबदारी निश्चित करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकार्यांनी दिले होते.