अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 307 मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 2 लाख 67 हजार 510 पैकी 1 लाख 76 हजार 984 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कोणताही अनुचित प्रकार न होता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे समजते. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का वाढला आहे.
गत विधानसभा निवडणुकीत 68.41 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी सायंकाळी 5 नंतरही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल, असा अंदाज आहे. या वाढलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याबाबत मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. सकाळी मतदानाचा वेग अतिशय संथ गतीने दिसून आला. सकाळी 9 वाजेपर्यंत 5.3 टक्के मतदान झाले तर सकाळी 11 वाजेपर्यंत 19.8 टक्के, दुपारी 1 वाजेनंतर 37.4 टक्के तर दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलेला दिसून आला. दुपारी 3 नंतर 53.19 टक्के मतदान झालेले होते. तर 5 वाजेपर्यंत 66.16 टक्के मतदान झाले.
आमदार डॉ. किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे मतदान केले. तर अमित भांगरे यांनी शेंडी, मधुकर तळपाडे यांनी सांगवी व मारूती मेंगाळ यांनी शेरणखेल येथे मतदान केले. या निवडणुकीत एकूण 9 उमेदवार हे नशीब अजमावत असून खरी लढत पाच उमेदवारांमध्ये असून अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत रंगत आणली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अमित अशोक भांगरे, महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण यमाजी लहामटे, अपक्ष उमेदवार माजी आमदार वैभव मधुकरराव पिचड, शिवसेनेचे (उबाठा) बंडखोर अपक्ष उमेदवार मधुकर शंकर तळपाडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती देवराम मेंगाळ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण लढत आहे.
दरम्यान, पिचड कुटुंबातील तिसर्या पिढीचे शिलेदार व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील आकर्षण ठरलेले यश वैभव पिचड यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी वृद्ध, दिव्यांग, आजारी मतदारांनीही मतदान केले. अनेक मतदारांपर्यंत निवडणूक यंत्रणेकडून मतदान पावत्या न पोहचल्यामुळे अनेक केंद्रांवर मतदारांना आपले नाव शोधत हिंडावे लागले. परिणामी त्यांना मनःस्ताप सहन करावा लागला. आपल्या गावात किती मतदान झाले? कोण विजयी होणार याचे दावे-प्रतिदावे सुरू झाले होते. अनेकांनी विजयी उमेदवारांबाबत पैजा सुध्दा लावल्या आहेत.