Wednesday, June 26, 2024
Homeनगरअकोलेच्या नगराध्यक्ष पदाची 27 सप्टेंबरला निवडणूक

अकोलेच्या नगराध्यक्ष पदाची 27 सप्टेंबरला निवडणूक

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक दि. 27 सप्टेंबर रोजी होणार असून त्यापदावर कोणाची वर्णी लागते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे नगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी असून त्यापदासाठी मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या नगरसेवकांमध्ये चुरस आढळून येत आहे.

गत वर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 17 पैकी 12 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले होते. माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे या पदाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. मात्र अखेर नगराध्यक्षपदाची माळ सोनालीताई नाईकवाडी यांच्या गळ्यात पडली.त्यांच्या निवडीनंतर पक्षांतर्गत धुसफूस सुरूच राहिली. सत्तारूढ गटाच्या नगरसेवकांमधील राजकारणाचा परिणाम शहराच्या विकास कामांवर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.

अखेर नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी आठवडाभरापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले आहे. 17 नगरसेवकांमध्ये मराठा समाजाचे 9 नगरसेवक असून त्यातील 7 नगरसेवक सत्तारूढ भाजपचे आहेत. सर्वसाधारण व्यक्तीसाठी नगराध्यक्षपद असल्यामुळे या पदावर मराठा समाजाला संधी देऊन माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी भावना मराठा समाजातून व्यक्त केली जात आहे.

तर ओबीसी समाजाचे असणारे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हेही या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे पिचड पिता पुत्र कुणाच्या पारड्यात वजन टाकतात याकडे नगरसेवकांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. कारण भाजपला निर्विवाद बहुमत असल्यामुळे पिचड पिता पुत्र सांगतील तोच नगराध्यक्ष होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या