मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
राज्यात नाशिक, अहमदनगर जिल्ह्यासह चार जिल्ह्यात नवीन एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत तसेच राज्यात यापुढे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी किमान 100 एकर जमिनीची उपलब्धता करुन द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे दिले. याशिवाय पुणे जिल्ह्यातील डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथे राज्यासह केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित पवार यांनी काल मंत्रालयात एमआयडीसीच्या संदर्भात आढावा घेतला. यावेळी बोलताना पवार यांनी नव्या एमआयडीसी स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या राज्याच्या विकासात उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा), अहमदनगर जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले, नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा एमआयडीसी बरोबरच जांबुटके (ता. दिंडोरी) येथील आदिवासी औद्योगिक समूह विकास योजना तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एमआयडीसीफ उभारण्यासाठीचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करा. एमआयडीसीच्या उभारणीसाठी किमान 100 एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक आहे. किमान 100 एकर जमीन उपलब्ध असेल तरच सर्वसोयींनीयुक्त एमआयडीसी उभी राहू शकते. त्यामुळे यापुढे एमआयडीसी मंजूर करताना किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील उंबरवाडी (ता. जुन्नर) येथे केंद्र फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी स्थानिक आमदारांच्या सोबत जागेची पहाणी करावी, असे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर बारामती एमआयडीसी मधील प्रलंबित कामे, चाकण एमआयडीसीतील शेतकर्यांच्या प्रश्नाविषयीही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार किरण लहामटे, देवेंद्र भुयार, दिलीप मोहिते-पाटील, अतुल बेनके (व्हिसीद्वारे), आमदार नितीन पवार (व्हिसीद्वारे), नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व्हिसीद्वारे उपस्थित होते.
प्रास्तवित नवी एमआयडीसी
नाशिक : कळवण-सुरगाणा
नगर : लिंगदेव, अकोले
अमरावती : वरुड
गडचिरोली : देसाईगंज (वडसा)