अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यात काल सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचल्याचे दृश्य पहावयास मिळत होते.
काल दुपारनंतर अकोले शहर आणि तालुक्याच्या विविध भागात पाऊस सुरू झाला. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. भंडारदरा वार्ताहराने कळविले की, पाणलोटात काल दुसर्या दिवशीही पाऊस कोसळत होता. त्यामुळे डोंगरदर्यांमधील धबधबे पुन्हा सक्रिय झाले असून ओढे-नाले खळखळू लागले आहेत. भंडारदरा आणि निळवंडे तुडूंब आहेत.
काल भंडारदरात 82, घाटघर 22, पांजरे 10, रतनवाडी 18 आणि निळवंडे 21 मिमी पावसाची नोंद झाली. कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातही दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदीतील पाणी वाढले होते. कोपरगाव वार्ताहराने कळविले की, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नांदूरमधमेश्वरमधून गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्यात येत आहे. काल सकाळी 9465 क्युसेकने विसर्ग होता. तो सायंकाळी 12620 क्युसेक करण्यात आला.