अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड अकोले,वय 76) व त्यांच्या मुलीस सोफा व खुर्चीला दोरीने बांधून तोंडाला चिकट टेप लावून चॉपर व पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देत चार इसमांनी 2,29,000 रुपयांच्या मुद्देमालासह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अकोले पोलिसांत काशीबाई डोंगरे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, दि 18 एप्रि 2025 रोजी पहाटे सव्वा पाच वाजेपासून ते सकाळी 11-30 वाजेच्या दरम्यान डोंगरे निवास, देवठाण रोड, मॉडर्न हायस्कूल जवळ अकोले येथील बंगल्यात फिर्यादी असताना आरोपी ओमकार शेटे (पूर्ण नाव माहीत नाही), निखिल चौधरी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), प्रभाकर भिमाजी वाकचौरे (राहणार नवलेवाडी, तालुका अकोले) व बाहेरी एक अज्ञात इसम यांनी फिर्यादी यांच्या घरी येऊन काशीबाई व त्यांची मुलगी राणी हिस सुती दोरीने सोफा व खुर्चीला बांधून ठेऊन तिच्या तोंडाला चिकट टेप लावला.
आधीमधी चिकट टेप काढून या दोघींकडून घरातील वस्तुंची माहिती घेऊन माहिती न दिल्यास मारहाण करून चॉपर व पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देत घरातील कागदपत्रे, बँकेचे सह्या असलेले कोरे चेक, बँकेच्या लॉकरची चावी, सोन्याचे दागिने, मोबाईल व अॅॅक्टिवा स्कुटी आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे 2,29,000 रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम बळजबरीने आरोपींनी चोरून नेला. या फिर्यादीवरून अकोले पो.स्टेला गुरनं -195/2025.भारतीय न्याय संहिता चे कलम-309 (6),333,351 (2) ,(3),115 (2) व आर्म अॅक्ट -3/25,4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी खांडबहाले करत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.